07 December, 2016

सशस्त्र सेना दलाच्या सुरक्षेमुळे देशाची प्रगतीकडे वाटचाल
---  जिल्हाधिकारी अनिल भंडारी
·         सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहीमेचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते उद्घाटन

हिंगोली,दि. 7:- जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे सशस्त्र सेना दल शौर्य, गुणवत्ता, शिस्त व सेवाभाव या बाबतीत सर्वोत्तम असून संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील देशाच्या सीमांचे रक्षण करतात. सशस्त्र सेना दलाने देशाला समर्थ सुरक्षा कवच प्रदान केले असल्यानेच देश प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात सशस्त्र ध्वज दिन संकलन मोहिमेचे उद्घाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. रणवीर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी  यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. भंडारी म्हणाले की, सैनिकांसाठी निधी संकलन करणे हे समाजकार्यातील मोठे योगदान आहे. सैन्यातील सुमारे 90 टक्के सैनिक हे 35 ते 40 या वयात सेवानिवृत्त होतात. त्यांचे देशाच्या संरक्षणामध्ये मोठे योगदान आहे.
सशस्त्र सेना दल देशाचे रक्षण करण्यास सदैव सुसज्ज असते. त्याचप्रमाणे नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी देखील प्रतिकुल परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडत असते. ध्वज दिन हा सशस्त्र सेना दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
यावेळी श्री. एच. पी. तुम्मोड म्हणाले की,  देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या विविध कल्याणकारी उपक्रम व मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य असून यामध्ये सर्वांनी सैनिकांसाठी भरघोस निधी जमा करावा.
                                                                                         
यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या शर्टला सशस्त्र सेनेच्या ध्वजाची पोस्टेज स्टॅम्प आकाराची प्रतिकृती चिकटवून सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी 2016 या वर्षाकरिता उभारण्यात येत असलेल्या ध्वज निधीला आपले वैयक्तिक योगदान दिले. देशसेवा करीत असताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचे कुटुंबीय तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, अत्यंविधीसाठी आर्थिक मदत, मतीमंद पाल्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, वसतीगृह आवास तसेच शिष्यवृत्तीसाठी ध्वज आदीकरीता ध्वज दिन निधी वापरण्यात येतो .
शासनामार्फत सन 2015 ध्वजदिन निधी संकलनाकरीता जिल्ह्यास 16 लाख 94 हजार रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतू, उदिष्टाच्या 112 टक्के म्हणजे 19 लाख उद्दिष्ट साध्य केले आहे. तर 2016 या वर्षाकरीता जिल्ह्यास 17 लाख 78 हजार 700 एवढे निधी संकलनाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
 यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते माजी सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थीनी कुमारी आरती हनुमंतराव खंदारे आणि कुमारी विनया भागवत संभाजी यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच आभार प्रा. किशोर इंगोले यांनी मानले. 

****







No comments: