17 December, 2016

सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना
महिला स्वयंसहाय्यता समुहांना मिळणार सवलतीच्या व्याजदराने कर्ज
हिंगोली, दि.17: राज्यातील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यानुसार राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्यता समुहांना सवलतीच्या व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबविण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाच्या दि. 14 ऑक्टोबर, 2016 च्या शासन निर्णयानूसार घेतला आहे.
राज्यातील महिलांमध्ये उद्यमशीलता वाढावी यासाठी राज्य व केंद्र शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहांना व्याजावर अनुदान देण्यात येते. या स्वयंसहाय्यता गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्यमशीलता वाढीस लागावी यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसेवी सहाय्यता समुहांना व्याज अनुदान देण्यात येत आहे. जे समुह नियमित कर्जाची फेड करतात त्यांना शुन्य टक्के दराने कर्जाची उपलब्धता व्हावी यासाठी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत केंद्र शासनाच्या प्रवर्ग 1 किंवा प्रवर्ग 2 प्रमाणे ज्या स्वयंसहाय्यता समुहाला व्याज अनुदान प्राप्त होईल, त्या कर्जासाठी व्याज अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान समुहांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. या कर्जाच्या व्याजाची मर्यादा 12.50 टक्के ठेवण्यात आली आहे.
कर्जफेडीची मुदत केंद्र शासन व रिझर्व बँकेच्या मागुदर्शक सूचनाप्रमाणे पुढील प्रमाणे असणार आहे.

अ.क्र.
बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा तपशील
कर्ज मर्यादा
कर्जफेडीची मुदत
1
समुहाला बँकेकडून मिळालेले पहिले कर्ज
बचतीच्या 4-8 पट किंवा किमान रु.50 हजार यापैकी जे अधिक असेल ते
6 ते 12 महिने
2
दुसरे कर्ज
बचतीच्या 5-10 पट किंवा किमान रु.1 लाख यापैकी जे अधिक असेल ते
12 ते 24 महिने
3
तिसरे कर्ज
प्रकल्प आराखड्याच्या किंमतीनुसार किंवा किमान रु. 2.5 लाख यापैकी जे अधिक असेल ते
2 ते 5 वर्षे
4
चौथे कर्ज
प्रकल्प आराखड्याच्या किंमतीनुसार किंवा किमान रु.5.10 लाख यापैकी जे अधिक असेल ते
3 ते 6 वर्षे

अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडे संपर्क साधावा.


*****

No comments: