07 December, 2016

विकलांग मुलांचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप’ करून विकलांगतेवर मात
हिंगोली, दि. 7 : अपंग कल्याण आयुक्तालय हे विकलांगांच्या कल्याणासाठी अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 अंतर्गत बऱ्याचशा योजना राबवित आहे. त्यात प्रामुख्याने विकलांग मुलांसाठी विशेष शाळांचा समावेश आहे. आज महाराष्ट्र राज्यात कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद व अंध प्रवर्गाच्या सुमारे 729 अनुदानित शाळा कार्यरत आहेत. बऱ्याचदा या शळांमध्ये वय वर्ष 6 नंतर मुले शिकण्यासाठी येतात.
शुन्य ते पाच वयोगटात विकलांग मुलांचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ झाल्यास त्यांना त्यांच्या विकलांगतेवर मात मिळवणे मोठ्या प्रमाणावर सहज शक्य होते. अशा प्रकारचा प्रयोग काही स्वयंसेवी संस्थांनी यशस्वीरित्या राबविलेला आहे. याची पाहणी करुनच आयुक्तालय आता शासनाकडे ‘आई शिकविते आईला’ या कार्यक्रमांतर्गत ‘होय, कर्णबधिर मुल बोलते’ ही अभिनव योजना सादर करत आहे. या योजने अंतर्गत कर्णबधिर मुलांचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ करून त्याला श्रवणयंत्र बसवून, वाचा उपचार देऊन पाच वर्ष वयापर्यंत हे मुल बालू कसे लागेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असे मुल बोलू लागल्यास ते सर्वसामान्य शाळेमध्ये जाऊन सहज शिकू शकेल. आयुक्तालयाने या योजनेसाठी शासनास प्रती कर्णबधिर मुलामागे रुपये 1 लाख अशी योजना प्रस्तावित केली आहे. ज्यात त्वरित निदान, रुग्णालयात जाऊन कानाची तपासणी करणे, श्रवणयंत्र बसविणे, आई समवेत मुलाने बालण्याचे प्रशिक्षण घेणे व शिकवणाऱ्या आईस/शिक्षकास मानधन या बाबींचा समावेश आहे.
हीच योजना मतिमंद मुलांसाठी सुध्दा राबविण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यांत येणार आहे. अशाप्रकारे आईच्या माध्यमातून या मुलांचे शाळेपूर्वीचे शिक्षण व हस्तक्षेप स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्याची योजना आहे.
अपंगत्वाचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ या व्यतिरिक्त आईला घरच्या घरी आरोग्याच्या बाबतीत काय काय खबरदारी घेता येईल याबाबतचे मार्गदर्शन देण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या आहाराचे औषधी गुण, आजीबाईचा बटवा अंतर्गत घरात असलेल्या मसाल्याचे औषधी गुण, पोटसाफ ठेवून रोगापासून दूर राहणे, निसर्गोपचाराचे पाच पांढरे विष, योग्य प्रकारचे व्यायाम , योगासने, प्राणायम व मनाची उत्तम ठेव याबाबतही जनजागृती करण्याचा मानस आयुक्तालय करणार आहे. या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्युट फॉर नॅचरोपॅथी, पुणे, अलीयावर जंग नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पीच ॲण्ड हेअरिंग डिसेबलीटी, बांद्रा (मुंबई) आणि राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था, खारघर, नवीमुंबई या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेकडे असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका यांच्यामार्फत ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ व आरोग्याचे महत्वाचे पैलू ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याचा मानस आहे.
3 डिसेंबर जागतिक अपंग दिन व 8 डिसेंबर राष्ट्रीय मानसिक विकलांग दिवस चे औचित्य साधून अपंग कल्याण आयुक्तालय लोकांना असे आव्हान करते की, मुळात रोग होवू नये व कदाचित झाल्यास व त्यामुळे अपंगत्व आल्यास त्याचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ करण्यासाठी शून्य ते सहा वयोगटातील मुलांवर जास्त लक्ष केंद्रीत करुन अपंगत्वावर मात मिळवण्यासाठी सर्वतोपरी उपाय करावे, ज्याने अपंगत्वावर मात मिळून मुलाचे सार्वजनिक जीवनात योग्य पध्दतीने समावेशन होईल. याबाबतचे प्रशिक्षण आयुक्तालय उपलब्ध करून देणार आहे. अधिक माहितीसाठी अपंग कल्याण आयुक्तालय, 3 चर्च पथ, पुणे - 411 001 येथे संपर्क साधावा. शासनाचे टोल फ्रि नंबर 1800 22 2014 यावर सर्व प्रकारच्या अपंगत्वाबाबत योग्य ती माहिती उपलब्ध आहे, असे अपंग कल्याणचे आयुक्त, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

No comments: