21 December, 2016

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी व्हावे
                                                                                           --- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली,दि.21:- मुंबई येथे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपुजन व भूमिपुजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. 24 डिसेंबर 2016 रोजी होणार आहे. या जलपुजन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.  
            जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे म्हणाले की, राज्य शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला होता. त्याअनुषंगाने मुंबई येथील राजभवना लगतच्या अरबी समुद्रातील सुमारे 15.96 हेक्टर बेटावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या जलपुजन आणि भूमिपुजन सोहळ्यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरील पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे.
            या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रुपयांची कामे होणार आहे. या कामात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी व जनतेसाठी जेट्टी, सुरक्षा विषयक व्यवस्था, आदीचा याबत समावेश असणार आहे. येत्या तीन वर्षात स्मारक पुर्ण करण्याचे शासनाचे नियोजन असून ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांचे जीवनमुल्य प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्र, पर्यटकांसाठी पर्यटनस्थळचा देखील समावेश स्मारकात असणार आहे.  
            महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असणार आहे. या स्मारकमुळे महाराष्ट्राची तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब नागरिकांना अनुभवता येणार आहे.


****

No comments: