30 June, 2017

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2017-18 उद्दिष्टपुर्तीचे नियोजन

हिंगोली, दि. 30 : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सन 2017-18 करिता राज्य व्यवस्थापन कक्ष मुंबई यांचे कडून उद्दिष्ट प्राप्त्‍ होणार आहे. सदर उद्दिष्ट सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 चे माहितीच्या आधारे शिल्लक राहिलेल्या लाभार्थी संख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट वितरित करण्यात येणार आहे.
सचिव ग्राम विकास विभाग यांचे दि. 01 ऑगस्ट, 2016 च्या पत्रान्वये प्रपत्र ब मध्ये प्राधान्यक्रम यादी ग्राम पंचायत मार्फत तयार करण्यात आलेली आहे. सदर यादीतील सन 2016-17 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत लाभ देवून शिल्लक पात्र लाभार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन / जीओ टॅगीग इत्यादी प्रक्रिया दि. 30 जून, 2017 रोजीपर्यंत पुर्ण करून घेणे बाबत सर्व गट विकास अधिकारी यांना या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
तसेच सचिव ग्राम विकास विभाग यांनी दि. 01 ऑॅगस्ट, 2016 पत्रान्वये तयार करण्यात आलेल्या प्रपत्र ड यादीमधील लाभार्थ्यांचे तालुकास्तरीय समितीने छाननी, पडताळणी व आवश्यकतेनुसार स्थळ पाहणी करून जिल्हा स्तर समितीकडे अंतिम निर्णयासाठी सादर करणे साठी सर्व गट विकास अधिकारी यांना या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. तसेच ग्रामसभेने न सुचविलेले लाभार्थी ग्रामसभा झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याचे आत तालुकास्तर समितीकडे अपिल करू शकतील तालुकास्तर समितीने सदर अपिल अर्जाची छाननी, पडताळणी व आवश्यकतेप्रमाणे स्थळ पाहणी करून अभिप्रायासह 30 दिवसाचे आत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करता येईल सदर यादी फ्रेमवर्क ऑफ इंम्प्लीमेंटेशन ऑफ पीएमएवाय-जी च्या मार्गदर्शक सुचनेनुसार असावीत, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
राज्याचे ऑलिंम्पिक व्हिजन जिल्ह्यातील खेळाडूंची वैयक्तीक माहिती

                  हिंगोली, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन 2020,2024,2028 व 2032 या वर्षात होणाऱ्या ऑलिंम्पिक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी सहभागी होउन प्राविण्य मिळविण्याच्या दृष्टीने राज्याचे ऑलिंम्पिक व्हिजन कृती आराखडा तयार करुन त्याचा अंमलबजावणी करीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे वतीने राज्यातील जिल्हा निहाय प्राविण्य प्राप्त सर्व गटातील खेळाडूंची वैयक्तिक व खेळाबाबत माहिती एकत्रित होण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आलेला आहे. सदरील गुगल फॉर्म (विहित नमुना अर्ज) शिक्षण विभागाच्या http://education.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर http://goo.gl/GNcsBN  या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
                        जिल्ह्यातील सर्व गटातील प्राविण्य प्राप्त खेळाडू, पालक, शाळा/महाविद्यालय/संस्था/मंडळे, त्यांचे प्रशिक्षक यांना आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे वतीने आवाहन करण्यात येते की, सदरील शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी व त्याची एक कॉपी आपल्या संबंधित जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे आपल्या फोटोसह सादर करावी.
                        याकरीता सन 2016-17 मधील सर्व गटाच्या खेळ निहाय, शालेय राष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धा, आखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे प्राविण्य प्राप्त खेळाडू व शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्पर्धा व वर्ल्ड विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यातील प्रथम, तृतीय व सहभाग असलेले खेळाडू यांची माहिती तसेच दिव्यांग खेळाडूंनी (पॅरा गेम्स - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ) आपली कामगीरी फॉर्म मध्ये देण्यात आलेल्या खेळप्रकारानुसार माहिती भरावी.
या बाबत काही शंका असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. उपरोक्त शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन जिल्ह्यातील खेळाडूंची ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. 

*****
नागरिकांना वेळेत जन्म मृत्युची नोंदणी करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.30: जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम 1969 , 1976 व सुधारित नियम 2000 नुसार प्रत्येक जन्म व मृत्यूची नोंद ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये करणे बंधनकारक आहे. जन्म किंवा मृत्यूचा दाखल्याशिवाय शालेय प्रवेशापासून, पासपोर्ट, वारस नोंदी केल्या जात नाही. प्रत्येक जन्म व मृत्यूची नोंद एक वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे. हा कालावधी उलटल्यानंतर न्यायालयामार्फत तसा आदेश मिळवावा लागतो. त्यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जन्म-मृत्यू विभाग कार्यरत असतो. तरी नागरिकांनी वेळेतच जन्म मृत्यूची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जन्म मृत्यू नोंदणी विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धनवे, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे आदींची उपस्थिती होती.
दि. 15 डिसेंबर, 2000 च्या शासन निर्णयनुसार अंमलबजावणी व सनियंत्रणाकरीता ग्रामपातळीवर ग्रामसेवक हे जन्म-मृत्यु नोंदणी निबंधक आहेत. तर नागरी भागात मुख्याधिकारी नगरपरिषद हे निंबधक आहेत. त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व जन्म-मृत्युची नोंद करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात  आरोग्य कर्मचारी, सहाय्यक परिचारिका व आरोग्य कर्मचारी (पुरुष), अंगणवाडी सेविका  हे नोटीफायर आहेत. जन्म मृत्यु नोदंणी विहीत मुदतीत न केल्यास नोंदणी शुल्क  दंड म्हणुन जास्त प्रमाणात आकारले  जाते. तेव्हा ग्रामपंचायती अंतर्गत जन्म मृत्यु नोंदणी विहीत मुदतीत करणे, खाजगी रुग्णालय मधील जन्म-मृत्यु नोंदणी विहीत वेळेत घेणेबाबत खाजगी रुग्णालयांना आवाहन केले. तसेच भारतीय जीवन विमा योजना, विविध इन्शुरंस कंपनी  व डाक कार्यालय (पोस्ट ऑफिस) यांचे मार्फत देण्यात येणारे लाभ जन्म मृत्युचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय देण्यात येवु नये जेणेकरुन मृत्यु नोंदणी वेळेत होण्यास मदत होईल अशीही चर्चा बैठकीत झाली.
जन्म मृत्युची नोदं कोठे करावी : ग्रामीण भागात - ग्रामपंचायत तर शहरी भागात 1) नगरपरिषद - हिंगोली, कळमनुरी व वसमत 2) उपनिबंधक - सामान्य रुग्णालय, हिंगोली आणि नगरपंचायत सेनगाव व औंढा येथे करावे.

जन्म मृत्युची उशिरा करावयाची नोदंणी

1 ते 21 दिवस
21 ते 30 दिवस
30 दिवसानंतर ते 1 वर्षाचे आत
1 वर्षानंतर
मोफत नोंदणी
21 दिवसानंतर परंतु 30 दिवसाचे आत विलंब शुल्क देवुन  करुन घेता येईल
गट विकास अधिकारी  (ग्रामिण भाग) मुख्याधिकारी  (शहरी भाग) यांचे लेखी परवानगीने व विलंब शुल्क 5/-
प्रथम न्यायीक दंडाधिकारी यांचे लेखी आदेशान्वये व विलंब शुल्क रु 10/-
तसेच ग्रामीण व शहरी भागातील विवाह नोंदणीचे प्रमाण वाढविणेसाठी ग्रामपातळीवर ग्रामसेवक यांनी तर शहरी भागात मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेले समाज मंदीर, मंगल कार्यालय यांच्या व्यवस्थापक कडुन दरमहा विवाहची माहिती घेवुन त्याची नोंद घ्यावी. जेणेकरुन विवाह नोंदणी करण्यास मदत होईल. तसेच संबधित मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक यांनी जन्म दाखल्याची प्रत घेवुनच विवाह करीता मंगल कार्यालय उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी केले.
विवाह नोंदणी विवाहाचे तारखेपासुन 90 दिवासाचे आत करणे आवश्यक आहे.विवाह नोंदणीकरीता खालील प्रमाणे शुल्क आकारले जातात. 1. विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्याचे दिनांकापासुन 90 दिवसाचे आत विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्यास रु.50/- विवाह नोंदणी शुल्कआकारण्यात येते. तर  विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतर 90 दिवसानंतर परंतु 1 वर्ष पुर्ण होण्यापुर्वी विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्यास रु.100/- विवाह नोंदणी शुल्कआकारण्यात येते. आणि विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतर 1 वर्षाहुन वा त्याहुन अधिक कालावधीने विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्यास रु.200/- विवाह नोंदणी शुल्कआकारण्यात येते. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क) तृप्ती ढेरे यांनी यावेळी दिली.

*****

29 June, 2017

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझाछायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन

*          निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
*          पंचवीस, वीस व पंधरा हजार रुपयांची पारितोषिके
*          तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे

हिंगोली , दि. 29 : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझाछायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा आज जाहीर केली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 25 हजार रूपये,  20 हजार रूपये, 15 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र माझाया संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, माझी कन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maha.photo01@gmail.com या ईमेल वर दि. 15 जुलै 2017 पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र 18x30 इंच एचडी (हाय रिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक सहायक संचालक(माहिती) सागरकुमार कांबळे (9175544155) यांच्याशी संपर्क साधावा.

*****
जिल्हास्तर युवक-युवती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 29 : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर विविध विषयांत युवांनी पार पाडलेल्या भूमिका, योगदान यामुळे युवांची  एक अव्दितीय समूह अशी ओळख समाजात निर्माण झालेली आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील  आवश्यक भाग आहे. महाराष्ट् राज्याचे क्रीडा धोरण 2012 च्या अनुषंगाने धोरणातील शिफारशीच्या अनुषंगाने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 35 वयोगटातील युवक - युवती यांना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील पुरस्काराचे स्वरूप युवक व युवतींसाठी रोख रक्कम रु.10 हजार व गौरवपत्र, सन्मानचिन्ह असणार आहे.
विहीत अर्ज पात्रतेचे निकष व अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली  यांनी केले आहे. अर्ज प्राप्त करून घेणे व जमा करणेची अंतिम तारीख दि. 10 जुलै, 2017 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

*****
जिल्हा परिषद येथे कृषि दिनाचे आयोजन

हिंगोली, दि. 29 : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिनाचे आयोजन शनिवार दि. 01 जुलै, 2017 रोजी 01.00 वाजता षटकोनी सभागृह, जिल्हा परिषद येथे करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवराणी नरवाडे उपस्थित राहणार आहेत.
तरी सदरील कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधुनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. डुबल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****  
अंत्योदय योजनेतंर्गत साखरेचे माहे जुलै महिन्यासाठी
328.15 क्विंटलचे नियतन मंजुर
हिंगोली, दि. 29 :  सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय कुटूंबांना प्रति शिधापत्रिकाधारकांसाठी माहे जुलै - 2017 या महिन्याकरीता  साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  हिंगोली  यांनी कळविले आहे
या नियतनानुसार प्रती  शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. त्यानुसार तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 87.18, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 42.52, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 69.47, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 68.61, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 60.37 असे एकूण 328.15 क्विंटल साखरेचे नियतन मंजुर करण्यात आले आहे. सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांनी केले आहे.

                                                                        ***** 
जिल्हा सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा
हिंगोली,दि.29 : महान संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांचा जन्मदिवस दि. 29 जून हा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आज जिल्हा सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी आर.के. गायकवाड व डी.आर.आव्हाड आणि जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांची उपस्थिती होती.    
            यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी म्हणाले की, दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबीस यांच्या प्रतिमानावर आधारित तयार करण्यात आली होती. प्रशांत चंद्र महालनोबीस हे पहिल्या पंचवार्षिक योजनेसाठी नियोजन मंडलाचे सदस्य ही होते. प्रशासनामध्ये संख्याशास्त्राचा जास्तीत-जास्त्‍ा प्रभावीपणे कसा वापर करता येईल याचा प्रत्येकाने प्रयत्न्‍ा करण्याचे आवाहन केले.
            महान संख्याशास्त्रज्ञ पी. सी. महालनोबिस यांच्या जीवनकार्याविषयी संशोधन सहाय्यक नितीन पाटील यांनी माहिती दिली. जिल्हा नियोजन कार्यालयातील संशोधन सहाय्यक व्यंकटेश भारती  यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्य्‍ाक्त्‍ा केले. 
            प्रास्ताविकामध्ये जिल्हा सांख्यिकी अधिकारी पारवेकर यांनी यावर्षीचा विषय ‘प्रशासकीय सांख्यिकी’ असल्याचे सांगून प्रशासनामध्ये सांख्यिकीचे महत्व याबाबत विविध दाखले देत विषद केले.
सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते महान संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
            यावेळी कार्यक्रमास जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनीधी विवेक डावरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लिपीक सुनिल भेासले यांनी केले तर नितीन पाटील यांनी आभार मानले.

*****
सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुरक्षा जवानांची महाभरती
        हिंगोली, दि. 29 : सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे हिंगोली जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व एस.आय.एस. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमीत कमी 10 वी पास, वय 18 ते 35 वर्षे, वजन किमान 50 किलो ग्रॅम, उंची 165 सें.मी. पेक्षा जास्त असलेल्या फक्त पुरुष उमेदवारांसाठी खाजगी सुरक्षा रक्षकांची 500 पदे भरावयाची आहेत.            
रिक्तपदे रोजगार मेळाव्याद्वारे पुढील ठिकाणी आयोजित केली आहे. 1) दि. 30 जून, 2017 व 01 जुलै, 2017 रोजी शासकीय डी. एड. महाविद्यालय जुन्या जिल्हा परिषद जवळ, हिंगोली, दि. 02 व 03 जुलै, 2017 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, वसमत, दि. 04 व 05 जुलै, 2017 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल कळमनुरी येथे सकाळी 10 ते 01 या वेळेत भरती आयोजित केली आहे. 
          रोजगार मेळाव्याच्या भरतीसाठी येताना उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावीत व आपली निवड झाल्यास 200/- रुपये फीस आवश्यक राहील. ही फीस एस.आय.एस. यांची नोंदणी फीस आहे. फीसशी सदर कार्यालयाचा कुठलाही संबंध नाही.  
          नोकरीवर हजर/रुजू झाल्यावर संबंधीतास किमान वेतन रु. 8 हजार दरमहा मिळेल तसेच पी. एफ., पुर्ण परिवाराकरीता मोफत वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युटी, वेतनवाढ, प्रमोशन, टिए/डिए चार्जेबल मेस, इत्यादी सुविधा एस. आय. एस. इंडिया सेक्युरिटी लि. पूणे या कंपनी तर्फे लागू होतील गरजू व इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या महाभरतीत मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा. असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. नोकरीस इच्छूक व गरजू उमेदवारांनी भ्रमणध्वनी क्रमांक, 9011265784, 9665208980, तसेच 02456-224574 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयामार्फत कळविण्यात येत आहे.

*****
स्वयंरोजगाराविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 29 : स्थानिक हिंगोली येथे युवक / युवती करिता स्वयंरोजगार वर आधारित 12 दिवसांच्या कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन दि. 03 जुलै, 2017 ते 14 जुलै, 2017 या कालावधीत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात शेळी पालन, म्हैसपालन इत्यादी विषयी या प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात युवक व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, प्रवेशाची अंतिम तारीख 02 जुलै, 2017 रोजीच्या दु. 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक दत्ता उचितकर मो. 9960189358 एमसीईडी जिल्हा कार्यालय व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी) चे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

28 June, 2017

पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 28 : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री मा. श्री. अर्जुन खोतकर हे दि. 29 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री मा. श्री. अर्जुन खोतकर हे गुरूवार, दि. 29 जून, 2017 रोजी दुपारी 12.00 वाजता तरोडा जि. नांदेड येथून शासकीय वाहनाने वसमत जि. हिंगोली कडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता वसमत, जि. हिंगोली येथे आगमन व मा. उध्दव ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जाहिर सभेस उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता वसमत जि. हिंगोली येथून शासकीय वाहनाने श्रीकृष्ण गार्डन, जि. परभणीकडे प्रयाण.

*****
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 28 : राज्याचे सहकार राज्यमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील हे दि. 29 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे.
सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील हे गुरूवार, दि. 29 जून, 2017 रोजी सकाळी 12.00 वाजता तरोडा जि. नांदेड येथून वसमत जि. हिंगोली कडे वाहनाने प्रयाण. सकाळी 12.15 वाजता वसमत, जि. हिंगोली येथे आगमन व उध्दव ठाकरे यांच्या सभेस उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता वसमत येथून श्रीकृष्ण गार्डन, जि. परभणी कडे प्रयाण करतील.

*****
पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 28 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 30 जून, 2017 व दि. 01 जुलै, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
शुक्रवार दि. 30 जून, 2017 रोजी सायंकाळी 05.30 वाजता मोर्शी जि. अमरावती येथून शासकीय वाहनाने वाशिम मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 09.30 वाजता शासकीय निवासस्थान हिंगोली येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दि. 01 जुलै, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान, एस. आर. पी. एफ. कॅम्प, हिंगोली येथे वृक्षारोपण कार्यक्रम. दुपारी 01.00 वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे कृषि दिनाचा कार्यक्रम. सायंकाळी 06.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने जिंतूर-जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.
***** 
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण तर्फे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन
हिंगोली, दि. 28 : भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण तर्फे गुरूवार दि. 29 जून, 2017 रोजी आपल्या ग्राहकांसाठी ग्राहक जागृती कार्यक्रम हॉटेल देव पॅलेस, रिसाला बाजार, अकोला रोड हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
ह्या कार्यक्रमात सल्लागार, भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम सर्व जनतेसाठी खुला असून ग्राहकांना त्यांच्या Landline/mobile/cable TV.ई. सेवा बाबतचे हक्क व अधिकार याबद्दल माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्रात एकूण 907.7 लाख भ्रमणध्वनी धारक असून 18.8 लाख  Landline ग्राहक आहेत. महाराष्ट्रात एकूण 9 दूरसंचार सेवा देणारे कंपनी आहेत. बऱ्याच ग्राहकांना TRAI ने ग्राहक हिताच्या दृष्टीने वेळोवेळी निर्गमित केलेले या बाबतचे नियम माहिती नाहीत. ग्राहकांना उपरोक्त सेवा बद्दलच्या तक्रार करण्यासाठी असल्यास ती कशी करावी अपील कसे करावे नंबर पोर्टेबिलीटी ची पध्दत कोणती? नको असलेल्या जाहिराती कशा प्रकारे बंद करतात? नको असलेले कॉल्स कसे बंद करावीत? मल्यावरदीत सेवा बाबतची नियमावली कोणती? सर्व केबल ग्राहकांना डिजिटल सेट टॉप बॉक्स घेणे बंधनकारक आहे. त्याचे फायदे कोणते याबाबत या कार्यक्रमात आहे.

***** 
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 28 : राज्याचे पर्यावरण मंत्री मा. श्री. रामदास कदम हे दि. 29 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे.
पर्यावरण मंत्री श्री. रामदास कदम हे गुरूवार, दि. 29 जून, 2017 रोजी दुपारी 12.00 वाजता तरोडा जि. नांदेड येथून शासकीय वाहनाने वसमत जि. हिंगोली कडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता वसमत, जि. हिंगोली येथे आगमन व मा. उध्दव ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जाहिर सभेस उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता वसमत जि. हिंगोली येथून शासकीय वाहनाने श्रीकृष्ण गार्डन, जि. परभणीकडे प्रयाण.

*****
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.87 मि.मी. पाऊस
          हिंगोली, दि. 28 :  जिल्ह्यात बुधवार दिनांक 28 जून, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 24.34 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  4.87  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 181.29 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 20.36 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  बुधवार दि. 28 जून, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 3.57 (238.57), वसमत - 3.43 (133.11), कळमनुरी - 7.67 (111.34), औंढा नागनाथ - 5.50  (207.15) , सेनगांव - 4.17 (216.59). आज  अखेर  पावसाची सरासरी 181.29 नोंद झाली.

***** 

27 June, 2017

परिवहन विभागाची 1 जुलैपासून नवीन सारथी 4.0 प्रणाली कार्यान्वित होणार

          हिंगोली, दि. 27 :  वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्ती करिता (ड्रायव्हिंग लायसन्स) सारथी 4.0 प्रणाली दि. 1 जुलै, 2017 पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्ती करीता यापूर्वी sarathi.nic.in या वेबसाईटव्दारे नागरिकांना अपॉइन्टमेंट घेता येत होती. परंतू आता सदर प्रणाली बंद करून नवीन parivahan.gov.in या वेबसाईटवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या सारथी 4.0 या प्रणालीव्दारे नागरिकांना अपॉईन्टमेंट घ्यावी लागणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

***** 
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 23.56 मि.मी. पाऊस
          हिंगोली, दि. 27 :  जिल्ह्यात मंगळवार दिनांक 27 जून, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 117.78 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  23.56  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 176.42 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 19.82 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  मंगळवार दि. 27 जून, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 30.14 (234.70), वसमत - 19.14 (129.68), कळमनुरी - 6.50 (103.67), औंढा नागनाथ - 19.50  (201.65) , सेनगांव - 42.50 (212.42). आज  अखेर  पावसाची सरासरी 176.42 नोंद झाली.

*****