सोयाबीन : घरचे बियाणे व उगवण शक्ती तपासणी
मागील 7 ते 8 वर्षापासून हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीन
पिकाकडे ओढला जात आहे. जिल्हयात दि. 13 जून
2017 पर्यंत सुमारे 100 मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पेरण्या सुरू झालेल्या
आहेत. तसेच यापूर्वी ही वृत्तपत्रातून प्रसिध्दी देऊन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी
कृषि विभागांच्या अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांना घरचे सोयाबीन वापरणे व काळजी घेण्याबाबत
मार्गदर्शन केलेले होते. जिल्हयात सोयाबीन लागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असून सोयाबीन हे खरीप
हंगामातील एक प्रमुख पीक बनलं आहे. सोयाबीन हे बहुगुणी पिक असून यात तेलाचे प्रमाण
20 ते 21 टक्के व प्रथीनाचे प्रमाण 40 ते
42 टक्के आहे. जिल्हयात खरीप हंगाम
2016 मध्ये 2 लाख 29 हजार 994 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची प्रत्यक्ष पेरणी झालेली
होती व त्या करीता 1 लाख 3 हजार 497 क्विंटल बियाणे वापरात आलेले होते. व बियाणे बदलाचे
प्रमाण 60 टक्के असे होते. तर खरीप हंगाम 2017 करिता सोयाबीनचे प्रस्तावीत क्षेत्र 2 लाख 19 हजार 243 हेक्टर असून त्या करीता
प्रस्तावीत बियाणे 1 लाख 6 हजार 880 क्विंटल असून बियाणे बदलाचे प्रमाण 65 टक्के आहे.
त्यामुळे हिंगोली जिल्हयात सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ
शकतो. या करिता जिल्हयातील शेतकऱ्यांनी मागील वर्षीचे बियाणे वापरावे. कारण सोयाबीन हे स्वपरागीसंचीत
पीक असून सोयाबीन पिकाचे सर्वच वाण हे सरळ वाण आहेत. त्यामुळे अशा बियाणांचे बियाणे
प्रत्येक वर्षी बदलण्याची आवश्यकता नसते. एकदा प्रमाणीत / बॅगमधील बियाणे पेरल्यानंतर
त्यांच्या उत्पादनातुन येणारे बियाणे पुढील तीन वर्षापर्यंत वापरता येते. त्यामुळे
शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2016साठी गेल्या वर्षी प्रमाणीत बियाण्यापासून घेतलेल्या उत्पादनातुन त्यांच्या
क्षेत्रासाठी लागणारे स्वत: कडील सोयाबीन बियाण्याची हेक्टरी मात्रा जास्त (75 किलो
प्रति हेक्टर) असल्याने बियाणेवरील खर्चात बचत होणार आहे. पर्यायाने सोयाबीन उत्पादनाच्या खर्चात बचत होईल.
खरीप हंगाम 2017 साठी बियाणे महामंडळाकडून व इतर खाजगी कंपनी कडून सोयाबीन बियाण्याची किंमत
प्रति किलो रु. 65/- ठरविली आहे. त्यामुळे प्रति एकर लागणाऱ्या 30 किलो बियाण्यासाठी
रु. 1950/- खर्च होणार आहे. जर स्वत:जवळील सोयाबीन बियाणे म्हणून वापरले तर 50 टक्के
सोयाबीन बियाण्याच्या किंमतीमध्ये बचत होईल व पर्यायाने उत्पादन खर्चात ही बचत होण्यास
मदत होणार आहे.
शेतकऱ्याकडील सोयाबीनचा बियाणासाठी
वापर करतांना घ्यावयाची कळजी
: सोयाबीनच्या दाण्याचे बाहेरचे आवरण अतिशय
पातळ असते. बियाण्यातील बीजांकुर व मुळांकुर बाहय आवरणाच्या लगत असतात. त्यामुळे त्याला
थोडाही धक्का लागला तरी बियाणाच्या उगवणीवर विपरीत परीणाम होतो. सोयाबीनची गोणी जराही
आपटली आणि त्यातील बियाणे म्हणून वापरले तर पिक उगवण शक्ती कमी होते. म्हणून घरच्या
घरी उगवण शक्ती तपासून बियाणांचा वापर करणे आवश्यक आहे.
उगवण शक्ती तपासणी:- सोयाबीणच्या घरच्या बियाणातून साधारण काडीकचरा काढून सरसकट
100 बिया घ्याव्यात. त्या बिया ओल्या रददी पेपर मध्ये किंवा ओल्या कापडामध्ये 4 ते
5 दिवस गुंडाळून ठेवाव्यात. एक दिवस आड करुन त्या पेपरवर / कापडावर हलक्या हाताने पाणी
शिंपडावे जेणे करुन बियाणे उगवणसाठी ओलावा पुरेसा राहील. शेवटी 5 दिवसानंतर किती बियाणांचे अंकुर झाले ते मोजावे.
साधारणत: सोयाबीनसाठी 70 टक्के उगवण शक्ती
आवश्यक आहे. म्हणजेच 100 बियांपैकी 70 बिया उगवल्यातर बियाणे पेरणीस योग्य आहे
असे समजावे . जर बियाणाची उगवण शक्ती 70 टक्यांपेक्षा कमी असेल त्याप्रमाणात जास्तीचे
बियाणे वापरावेत.
सोयाबीनचे
लवकरच योणारा करपा रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा बिज प्रक्रिया
प्रति किलो बियाण्यास 6 ग्रॅम या प्रमाणे करावी. तसेच सुरवातीचे काळात येणाऱ्या किडी
पासून संरक्षण करण्यासाठी पेरते वेळी 4 किलो फेरेट 10 जी एकरी पेरणी करावी.
बुरशी नाशक व जिवाणू संवर्धनाची बीज
प्रक्रिया :- अ) थायरम / बावीस्टीन बुरशी नाशकाची बीज प्रक्रिया
:- सोयाबीन पीकाचे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी 4.5 ग्रॅम थायरम किंवा
3.00 ग्रॅम बावीस्टीन प्रति किलो बियाण्यास लावण्यासाठी गोणपाटावर बियाणे सारखे पसरुन त्यावर हलक्या हताने
पाणी शिंपडून थायरम / बावीस्टीन हाताने हळुवार चोळावे जेणेकरुन सदर बुरशी नाशक सारख्या
प्रमाणात बियाण्यास लागेल. अशी प्रक्रिया केल्यामुळे पेरणी करते वेळेस बुरशी नाशकाची
पावडर उडून प्रक्रिया करणाऱ्याच्या व पेरणी करणाऱ्याच्या नाकात व तोंडात जाणार नाही
त्यामुळे डोळयात पाणी येणे, डोळे चुरचुरणे असा त्रासही होणार नाही. ब) सोयाबीन बियाण्यावर जीवाणू संवर्धन प्रक्रिया
:- यासाठी एक लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळ
बारीक करुन टाकून पुर्णत: विरघळून घ्यावे व नंतर हे द्रावण तयार करुन घ्यावे. द्रावण
थंड झाल्यानंतर सोयाबीन
बियाणे सावलीमध्ये गोणपाटावर पातळ थरात
समान पसरवून त्यावर तयार केलेले द्रावण हलक्या हाताने शिंपडून सर्व बियाण्यावर एक सारखे
लावून त्यावर रायझोबीयम जपोनिकम व पि. एस. बी. हे जीवाणू संवर्धन
प्रत्येकी 250 ग्रॅम प्रती
किलो बियाणे या प्रमाणत पेरण्यापूर्वी तीन तास आधी समप्रमाणात लावून सावलीत वाळवावे.
जीवाणू संवर्धन बीज प्रक्रिया करतांना बियाणे जोरात घासू नये तर ते हलक्या हाताने चोळावे.
जीवाणू
संवर्धनाच्या प्रक्रियेमुळे उत्पादनात 10 टक्के पर्यंत वाढ होते. व पीकाच्या मुळावरील गाठीत वाढ होवून गाठीतील
जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून पिकाच्या वाढीस मदत करतात व त्यामुळे सोयाबीन पिकास
जादा नत्रयुक्त खत देण्याची गरज भासणार नाही.
तरी
हिंगोली जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरगुती सोयाबीन बियाणाचा वापर करावा.
तसेच बियाणे पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासून त्याप्रमाणे एकरी बियाणाचा वापर
करावा. पेरणी पूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची व जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करुन
घ्यावी. ज्यामुळे खर्चात बचत होवून उत्पादनात भरीव अशी वाढ होण्यास निश्चित मदत होईल.
तरी
जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही व त्यांना सोयाबीनची पेरणी करावयाची
आहे. अशा शेतकऱ्यांनी उपरोक्त पध्दतीने सोयाबीनची पेरणी करून उत्पादनात भरघोस वाढ करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : जिल्हास्तरावर
: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
कृषि विकास अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, मोहीम अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण
निरीक्षक जिल्हा व्यवस्थापक महाबीज , तालुकास्तरावर
:- तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पं.स, विस्तार अधिकारी (कृषि) पं.स, मंडळस्तरावर : मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक
,ग्रामस्तरावर : कृषि सहाय्यक व ग्रामसेवक. आदी शासकीय कार्यालये व त्यातील अधिकारी
व कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी संपर्कात राहून सोयाबीन पिकाविषयी अधिक माहिती घेऊन उत्पादनात
भरघोस वाढ करावी.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****
No comments:
Post a Comment