10 June, 2017

जिल्ह्यातील विकासकामे वेळेत पूर्ण करा
                                                                - पालकमंत्री दिलीप कांबळे
            हिंगोली,दि.10: जिल्ह्याच्या विकासासाठी सुरु असलेली विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत  पुनर्वसन,भुकंप  पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास  वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.
                जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजीत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, निवास उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी, जिल्हा पूरवठा अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम.देखमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पालकमंत्री कांबळे पूढे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रश्नांचा अभ्यास करुन तसेच नागरिकांच्या समस्यांची माहिती घेवून त्यांना सन्मानपूर्वक वागणुक देत सर्व यंत्रणांनी कामे करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गेत कामे गुणवत्तपूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घेवून सर्व विभागांनी निधीचा काटेकोर विनियोग करावा. जिल्ह्यात झालेल्या कामांचा तसेच चालू असलेल्या कामांची तपासणी करण्यात येईल, असेही कांबळे यावेळी म्हणाले. 
                जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाचा आढावा घेत पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, खरीप हंगाम 2017-18 साठी शासनाने जिल्ह्यास 885 कोटी 25 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट दिले असून राष्ट्रीयकृत बॅंकांनी पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत.तसेच सन 2016-2017 अंतर्गत पिक विम्याचे मंजूर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा. खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने मुबलक प्रमाणात बियाणे व खताचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधीताना यावेळी दिल्या. पावसाळा सुरु होत असल्याने नैसर्गिक आपत्ती उद्भवू नये, यासाठी सर्व यंत्रणानी सतर्क राहण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. कांबळे यांनी यावेळी दिल्या.
                राज्य शासनाने मनरेगा अंतर्गत समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्याला 10 हजार अहिल्यादेवी सिंचन विहिरी मंजूर केल्या असून गावनिहाय ग्रामसभा घेवून विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करावे. स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक व वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पुर्ण करुन शंभर टक्के जिल्हा हगणदारी मुक्त करावा. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याला 3 हजार 715 तर (नागरी) अंतर्गत हिंगोली आणि वसमत नगर परिषदांना एकुण 5 हजार 836 घरकुलांचे उद्दिष्ट उद्दिष्ट प्राप्त झाले असून सदर योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देत वेळेत उद्दिष्ट पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुरु असलेले बांधकाम लवकरात -लवकर पूर्ण करुन इमारतीचे हस्तांतरण करावे.
औंढा नागनाथ येथील मुख्य रस्त्यावर गटारीतील पाणी आणि कचरा झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर पंचायतीने तात्काळ शहरातील गटारी साफ करुन रस्त्यावरील कचरा काढून शहरात स्वच्छता ठेवावी. तसेच औंढा नागनाथ शहराच्या सर्वांगिण विकासाकरिता 79 कोटींचा सुधारित आराखडा तयार करण्याच्या सुचनाही  पालकमंत्री श्री. कांबळे यांनी यावेळी दिल्या.
                1 जूलै रोजी जिल्ह्यात 7 लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील सर्व कार्यालय, शाळा- महाविद्यालये आणि नागरिकांना या उपक्रमात सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री कांबळे यांनी केले.
                यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी महसूल विभाग, पुरवठा विभाग, रोहयो, पोलीस, जिल्हा परिषद, कृषी, जलयूक्त शिवार योजना, नगर परिषद-नगर पंचायत, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा अग्रणी बँक, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, राज्य उत्पादन शुल्क, जलसंपदा, समाज कल्याण आदी विभागाचा आढावा घेतला.
*****


No comments: