12 June, 2017

पावसाळ्यात पडणाऱ्या विजेपासून स्वत:चे रक्षण कसे करावे ?
            जून - जुलै महिन्यात पावसाळा सुरु होतो. यावेळी शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीला सुरुवात करतो. शेतमजूरही शेतीच्या कामात असतात. अशा या कालावधीत वादळ आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यास शेतावर काम करणारे शेतकरी शेतमजूर आणि जनतेलाही नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात पडणाऱ्या वीजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सूचविलेल्या गोष्टींची खबरदारी घेतल्यास विजेच्या आपत्तीला तोंड देता येऊ शकते.
विजेचा कडकडाट होत असतांना कोसळणाऱ्या विजेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढील बाबीचा अवलंब करावा.
शेतात काम करीत असताना वीजा कडाडत असल्यास शेतावरील घराचा आसरा घ्यावा. पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर यावे. एखाद्या झाडाजवळ असल्यास झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे. ओल्या शेतात रोपे लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्ती किंवा तलावात काम करीत असलेल्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या किंवा सुरक्षित स्थळी जावे. शेतामध्ये काम करीत असतांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे असेल तिथेच रहावे. शक्य झाल्यास पायाखाली लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट सारख्या वस्तू अथवा कोरडा पाला पाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवावे मात्र डोके जमिनीवर ठेऊ नये.
            शेतात काम करतांना शेतकरी, शेतमजूर कृषि औजारे हाताळत असतो. अशावेळी धातुपासून बनविलेल्या वस्तू यंत्र इत्यादीपासून त्यांनी दूर रहावे. गावाभोवती किंवा शेत, आवार, बाग बगीचा आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नये. कारण ते वीजेला सहजपणे आकर्षित करीत असते. धातूची दांडी असल्यास छत्रीचा उपयोग करु नये. वीजेच्या खांबाजवळ थांबू नये किंवा उभे राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये. उंच जागेवर झाडावर चढू नये. वीज वाहक असलेल्या रेडियेटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप आदी वस्तूपासून दूर रहावे. वीजा कडाडत असल्यास विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. शक्यतो घरातच रहावे, बाहेर पडू नये. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलीफोन यांना अशावेळी स्पर्श करु नये व वीजेपासून चालणाऱ्या यंत्रापासूनही दूर रहावे. कपडे वाळविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचा वापर करावे. तारेचा वापर करु नये.
            कोसळणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्यासाठी मजबूत असलेले पक्के घर हे सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपापल्या घरी वीज वाहक यंत्रणा बसवावी. टेलीफोन आणि विजेचे खांब किंवा टेलीफोन/टेलीव्हिजन टॉवर यापासूर दूर रहावे. आपल्या घराशेजारी किंवा शेत जमिनीच्या आसपास कमी उंचीची व चांगल्या प्रतीची फळझाडे लावावी.             
            मोठया प्रमाणात वीजा चमकत असल्यास किंवा कडकडाट सुरु असल्यास प्लग जोडलेली उपकरणे हाताळू नये. दूरध्वनीचा वापर अशावेळी करु नये. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर किंवा नौका यावर असल्यास तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे. अशा परिस्थितीत वाहनातून प्रवास करु नये. एखाद्याच्या शेतावर किंवा घराशेजारी उंच वृक्षाचा खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे. म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनातच रहावे. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नये. जंगलात गेले असल्यास कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. वृक्ष दलदलीची ठिकाणे अथवा पाण्याचे स्त्रोत असल्यापासून शक्यतो दूर रहावे किंवा आकाशाखाली राहण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घेणे चांगले आहे. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यक असल्यास खोलगट ठिकाणी रहावे. एकाच वेळी जास्त व्यक्ती एकत्र राहू नये. दोन व्यक्ती असल्यास किमान 15 फुट अंतरावर असे रहावे. पोहणारे किंवा मच्छिमारी करणाऱ्यांनी अशावेही तात्काळ पाण्यातून बाहेर यावे. अशा पध्दतीचा अवलंब केल्यास वीजेपासून स्वत:चे संरक्षण करण्यास मदत होते.

                                                                                                                                -- अरुण सुर्यवंशी
                                                                               जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली
*****                                                    

No comments: