वसमत पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्याविरुध्द
अविश्वास ठराव पारित करण्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन
हिंगोली (जिमाका) , दि. 29 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 72 (2) अन्वये
परसराम विठ्ठल जाधव आरळ ता.वसमत यांनी वसमत पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती
यांच्याविरुध्द अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याबाबत कळविले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे
कलम 72 (3)(4) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी कोविड-19 च्या नियमाचे पालन करुन वसमत पंचायत समिती सभापती व उपसभापती
यांच्याविरुध्द अविश्वास ठराव पारित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र
जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 72 (3) अन्वये दिनांक 18 ऑक्टोबर,
2021 रोजी दुपारी 12.00 वाजता पंचायत समिती, वसमत येथे विशेष सभा आयोजित केली आहे.
या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, वसमत यांची नेमणूक करण्यात
आली आहे.
उक्त सभापती व उपसभापती विरुध्द अविश्वास ठराव पारित करण्याची
प्रक्रिया पूर्ण करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सभेच्या इतिवृत्तासह
जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment