27 September, 2021

 



वैभव बांगरचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश

हिंगोली जिल्ह्याचा गौरव वाढणारा : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्याचे भूमिपूत्र व हिंगोली येथील रहिवाशी वैभव सुभाष बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. वैभव बांगर यांनी मिळविलेले हे यश हिंगोली जिल्ह्याचा गौरव वाढवणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

जिल्ह्याचे भूमिपूत्र व हिंगोली येथील रहिवाशी वैभव सुभाष बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पेढा भरुन त्यांचे अभिंदन केले. त्यावेळी ते बोलत. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी उपस्थित होते.

जिल्ह्याचे भूमिपूत्र व हिंगोली येथील वैभव सुभाष बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर वैभव यांनी परीक्षेत यश  मिळविल्याचे समजताच हिंगोलीकरांनी जल्लोष केला व बांगर कुटुंबियांवर  अभिनंदनाचा वर्षाव झाला. हिंगोली जिल्ह्यात वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी हे यश मिळविले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्वात लहान वयाचा अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला. या परीक्षेत त्यांना 442 वी रँक मिळाली आहे.

हिंगोली येथील विद्यानिकेतन इंग्लीश स्कूलमध्ये इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी थेट पुणे गाठले. पुणे येथे बी.के. बिर्ला कॉलेजमध्ये इयत्ता बारावीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र यावेळी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या वैभव यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयातून बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. बी.ए.चे शिक्षण घेत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली आणि चार वर्षाच्या खडतर प्रयत्नानंतर हे यश त्यांनी मिळविले आहे.

ध्येय निश्चित करुन तयारी केली- वैभव सुभाष बांगर

पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अधिकारी होण्याचे निश्चित केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी कला शाखा निवडली. त्यामुळे बी.ए. सोबतच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासही सुरु केला. दररोज बारा तास अभ्यास व स्वत: नोटस तयार करुन त्याचे वाचन सुरु केले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय घेतले. घरी आई , वडील व कुटुंबियांनी पाठबळ दिले अन हे यश मिळाले आहे. तरुणांनी ध्येय निश्चित करुन त्यानुसार वाटचाल केल्यास कुठलीही गोष्ट कठीण नाही. या गुणांवर आयपीएस होऊ शकेल मात्र आयएएस साठी तयारी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

****

No comments: