14 September, 2021

 



केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी

                                                                                                - खासदार हेमंत पाटील

        हिंगोली, दि. 14 : मागासलेला जिल्हा म्हणून असलेली हिंगोली जिल्ह्याची ओळख पुसून टाकण्यासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिले.

            जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली यांच्यावतीने आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने आणि जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांची उपस्थिती होती.

            यावेळी श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करुन पिक विम्याचे वितरण करावे. तसेच पिकविमा कंपनीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय सुरु करावे. औंढा शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागासाठी अनेक योजना आहेत. परंतू या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनासाठी उपलब्ध  निधीचा योग्य विनियोग करावा. नरेगा अंतर्गत वैयक्तिक विहिरींची योजना राबविण्यात याव्यात. तसेच नरेगा अंतर्गत संबंधित यंत्रणांनी पाणंद रस्त्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा. विद्युत विभागाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत विद्यूत विभागाने जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील विज जोडणी करुन ज्या ठिकाणी ट्रॉन्सफार्मरची आवश्यकता आहे त्याठिकाणी त्वरीत ट्रॉन्सफार्मर बसविण्याची कार्यवाही करावी.  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देवून कामे पूर्ण करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी आपल्यास्तरावर विशेष मोहीम राबवून जॉब कार्डचे वितरण करावे, अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या.

            आमदार तान्हाजी मुटकुळे  व आमदार संतोष बांगर यांनी आपणास दिलेली कामे सर्व यंत्रणांनी नियोजन करुन वेळेत पूर्ण करावीत. म्हणजे प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च होईल. तसेच विकास कामे प्रलंबित न ठेवता पाठपुरावा करुन सदर कामे पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.

            जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, दिशा समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील व विविध लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या प्रत्येक सुचनांचे तंतोतत पालन करुन एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि केंद्र पुरस्कृत योजना जिल्ह्यात राबवितांना सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून विकास कामे वेळेत पूर्ण करावीत व त्याचा अनुपालन अहवाल दहा दिवसात सादर करावा, अशा सूचना दिल्या.

            यावेळी खासदार पाटील यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, भूमि अभिलेख कार्यालयाचे संगणकीकरण योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, गौण खनिज, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री उद्योग योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना यासह अन्य केंद्रशासन पुरस्कृत योजनांचा प्रगतीचा आढावा घेतला.

            प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पोहरे यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी  दिशा समिती काम करत असल्याची माहिती प्रास्ताविकात दिली. जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.  

            यावेळी दिशा समितीवर नव्याने नियुक्त केलेल्या सदस्यांचा तसेच जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांची सहसंचालक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल खासदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            यावेळी जिह्यातील पंचायत समितीचे सभापती, समितीचे अशासकीय सदस्य, विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.

****

No comments: