20 September, 2021

 



कृषी विज्ञान केंद्र हिंगोली येथे पोषण वाटिका महाभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 20 : आज दि 17/09/2021 रोजी भारत अमृत महोत्सव निमित्त दि. 17 सप्टेंबर, 2021 रोजी राष्ट्रीय पोषण महिना, आंतरराष्ट्रीय पोषक अन्न वर्ष 2023 निमित्त पोषण वाटिका महाभियान व वृक्षारोपण या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रथमत: वसंतराव नाईक आश्रमशाळा, वारंगा येथील शाळेमधील 71 मुलींना राजगीरा लाडू, नाचणी लाडू व इतर पोषक पदार्थ वाटप करण्यात आले. या शाळेतील कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.पी.पी.शेळके, विषय विशेषज्ञ-गृह विज्ञान प्रा.रोहीणी शिंदे, वारंगा गावचे सरपंच ओम पाटील कदम हे उपस्थित होते.

            या नंतर कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे पोषण वाटिका महाभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव माने हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परीषद सदस्या डॉ.स्वर्णमाला शिंदे हे होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी.पी. शेळके, विवेकानंद सेवाभावी संस्थेचे पुरुषोत्तम कुटे व ईफकोचे प्रतिनिधी कैलास ढाले हे होते. या कार्यक्रमास हिंगोली जिल्हयातील 121 शेतकरी बांधव व महिला शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ.पी.पी.शेळके यांनी पौष्टीक आहारामध्ये ज्वारीचे व इतर भरडधान्याचे महत्व या विषयावर, प्रा.राजेश भालेराव यांनी गव्हाच्या नविन वाणा विषयी, प्रा.अजयकुमार सुगावे यांनी चुकीच्या आहारा विषयी मार्गदर्शन केले.

             प्रमुख पाहूणे बोलताना डॉ.स्वर्णमाला शिंदे यांनी शेतक-यांची दशा व दिशा तसेच  शेतक-यांना मातीपरीक्षण, नविन वाण, पिकातील फेरबदल, व शेतक-यांनी पारंपारीक शेतीत कसा बदल करावा या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा. शिवाजीराव माने यांनी सेंद्रीय शेती व सकस आहार या बाबत आपले मनोगत व्यक्त केले.

              यावेळी तोंडापूर येथील महिला शेतकरी यांनी स्वत:च्या घरी नाचनीचे व बाजरीचे लाडू तयार करुन उपस्थित मान्यवरांना खाण्यासाठी ‍दिले. यानंतर जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी पोषण वाटिका महाभियान व वृक्षारोपण या विषयावरील केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर व इतर मंत्र्यांची एलईडी वॉल यावर भाषण ऐकले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व शेतकरी यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले.

*******

No comments: