कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण व चाचण्या वाढविण्यावर भर द्यावा
-- सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे
हिंगोली,
(जिमाका) दि. 19 : कोरोनाला
रोखण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त लसीकरण व कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर
द्यावा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश
टोपे यांनी आज केले.
आज येथील जिल्हा
सामान्य रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल, बालरुग्ण अतिदक्षता, नवजात शिशू कक्षाला भेट
देऊन तेथे उपलब्ध करुन दिलेल्या बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन पुरवठा व रुग्णालयातील
मंजूर, भरलेली व रिक्त पदांची माहिती घेतली. याप्रंसगी आमदार चंद्रकांत नवघरे,
उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी सार्वजनिक
आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलताना पुढे म्हणाले, हिंगोलीची सध्याची परिस्थिती
चांगली आहे तरी पण हिंगोलीसह राज्यात लसीकरण व कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर
देण्यात येणार आहे. दिवसातून किमान दोन हजार कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना त्यांनी
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. केंद्र शासन आता लसीचे प्रमाण वाढवून देत असून
राज्यासाठी महिन्याला तीन कोटी लसीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्राकडे मागणी
करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लस उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त करुन केंद्र
शासन करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
एनआरएचएमच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक
जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा व उपजिल्हा
रुग्णालयात सीटी स्कॅन, डायलेसीस, सोनोग्राफी मशीन यासह इतर अत्याधुनिक सुविधा
उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य विभागातील रिक्त असलेली पदे लवकरच शंभर
टक्के भरण्यात येणार आहेत. सध्या गट-क व गट-ड पदाची भरती करण्यात येत आहे. त्याची
परीक्षा येत्या 25 व 26 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहेत. या परीक्षा पारदर्शकपणे
घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन करुन आरोग्यमंत्री
श्री. टोपे यांनी परीक्षार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी
पदाधिकारी, रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment