नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
पूर परिस्थतीत काळजी व खबरदारी घ्यावी
हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात सद्यस्थितीत झालेला जोरदार पाऊस तसेच येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणाची पाणी पातळीमुळे सर्व नद्या मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना तसेच लहान, मोठ्या ओढ्या, नाल्यांना पूर आलेला आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तसेच नदीकाठच्या गावांना उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खालील प्रमाणे आवाहन केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण पूर्णपणे भरल्यामुळे धरणातून पूर्णा नदीत एकूण 71 हजार 843 क्यूसेक्स इतका विसर्ग चालू असल्याने पुढे पूर्णा नदीवर असलेल्या येलदरी धरणातून एकूण 1 लाख 3 हजार 261 क्यूसेक्स इतका विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात आलेला आहे. यापुढे पूर्णा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर धरणातून एकूण 01 लाख 10 हजार 531 क्युसेक्स इतका विसर्ग पूर्णा नदीत करण्यात आलेला आहे. यामुळे सेनगाव तालुक्यातील येलदरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने सेनगाव जिंतूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच औंढा नागनाथ धार माथा येथील पूल पाण्याखाली गेल्याने औंढा-जिंतूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यासाठी नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी याबाबत खबरदारी बाळगावी.
नद्यांना आलेल्या पूरामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना , नद्यांना जोडलेल्या कालव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून कालव्या काठच्या गावांना देखील पुराचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नदी, नाले, कालव्या काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.
काय करावे :
1) गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.
2) गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगर पालिका प्रशासनास कळवावे.
3) गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.
4) पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.
5) पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी, इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये.
6) कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.
7) पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरुन जाऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
काय करु नये :
1) पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.
2) पुराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.
3) दूषित, उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.)
4) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करु नका.
5) पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत व खोल पाण्यात जाऊ नका.
6) पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करू नका.
****
No comments:
Post a Comment