22 September, 2021

 

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या नियामक परिषद सदस्यपदी

क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका) दि.22 : राज्याची क्रीडा विषयक कामगिरी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होऊन त्या अनुषंगाने राज्यात मुबलक प्रमाणात दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन खेडाळूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण  मिळावे. यासाठी शासनाचा महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे.

कोणत्याही देशाची प्रगती ही केवळ आर्थिक विकासाच्या कसोटीवर मोजली जात नाही तर ती आता शिक्षण, आरोग्य , रोजगार अशा निकषांच्या आधारे मोजली जाते. त्यामध्येही शिक्षणास सर्वाधिक महत्व देण्यात आलेले आहे. क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची असून क्रीडा क्षेत्रातील प्रगती गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र व पुरक बाबींमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे. देश विदेशात क्रीडा विषयक विविध अभ्यासक्रम कार्यान्वित आहेत. राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक यांना प्रगत अभ्यासक्रमासाठी क्रीडा विद्यापीठ असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने आंतरराष्ट्रीय  क्रीडा विद्यापीठ , महाराष्ट्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र अधिनियम 2020 मधील कलम क्र. 23 मध्ये नियामक परिषदेबाबत तरतूद असून या नियमातील पोट कलम (4) च्या अनुषंगाने शासनाने  भारतीय फुटबॉल संघाचे माजी गोल रक्षक हेन्री मेनेझिस, रग्बी खेळाचे भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू राहूल बोस, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापिठाच्या प्रो. कुलगुरु डॉ. विद्या येरवडेकर, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्रीडा विकास निधी बोर्डाचे सदस्य प्रा. रत्नाकर शेट्टी, अमरावतील येथील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली ठाकरे, माजी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू निलेश कुलकर्णी, शुटींग खेळात महाराष्ट्रात पहिला अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीमती अंजली भागवत, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि राज्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त या सन्माननीय सदस्यांची आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र च्या नियामक परिषदेसाठी नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

No comments: