16 September, 2021

 


मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना दृष्टी देण्याचे काम

                                           पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16 : मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना दृष्टी देण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.

वसमत तालुक्यातील खांडेगाव येथे आ. राजूभैय्या नवघरे प्रतिष्ठानच्या वतीने व लॉयन्स नेत्र रुग्णालय, नांदेड, उदगीर व हिंगोली यांच्या सहकार्याने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन व विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे होते. यावेळी आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती महादेव एकलारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, सर्वांची दृष्टी मजबूत राहावी यासाठी नेत्र शिबिराचा उपक्रम स्तूत्य आहे. या माध्यमातून एक दृष्टी निर्माण करण्याचे काम होत आहे. आपले आरोग्य किती महत्वाचे आहे हे कोरोनामुळे आपण शिकलो आहोत. कोरोना अजून संपलेला नाही. यासाठी आपण स्वत:सह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. वरिष्ठ नेत्यांचे आशिर्वाद आणि प्रेम असल्यामुळेच विविध विकास कामे करण्यासाठी प्रेरणा मिळते. आ. राजू नवघरे हे सर्व समाजाचा वारसा चालवणारे नेते असल्याचे प्रतिपादन करुन आ. राजू नवघरे यांनी मागणी केल्यानुसार हिंगोली जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठवड्यातून एक दिवस देण्यात येईल, असे सांगितले.

माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आ. राजू नवघरे आणि पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी  विविध सामाजिक, शासकीय कार्यक्रम हिरीरीने पाठपुरावा करुन राबवित असल्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक केले.

 

प्रारंभी आ. राजू नवघरे यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचे काम करत असून भविष्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे सांगतांना जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आठवड्यातून एक दिवसाचा वेळ जिल्ह्यासाठी देण्याची विनंती केली.

यावेळी डॉक्टर, आशा वर्कर, पदाधिकारी व परिसरातील विविध नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

 

No comments: