नाट्य सभागृहाच्या
रुपाने स्व.खासदार राजीव सातव यांच्या नावाने
वास्तू स्थापन झाल्याचे
समाधान
- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड
हिंगोली,
(जिमाका) दि. 21 : जिल्ह्याच्या मुख्यालयी नाट्य सभागृहाच्या रुपाने स्व. खासदार
संसदरत्न राजीव सातव यांच्या नावाने वास्तू स्थापन केल्याने स्वप्न पूर्ण झाल्याचे
समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली
जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.
येथील
नगरपरिषदेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहास स्व. खासदार संसदरत्न
राजीव सातव यांचे नाव देण्याचा नामकरण सोहळा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या
हस्ते संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, डॉ.
प्रज्ञाताई सातव, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य
कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी
बोलताना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, यापूर्वी नाट्यसभागृहाच्या
भेटी दरम्यान या नाट्यसभागृहास स्व. खासदार राजीव सातव यांचे नाव देण्यात यावे अशी
इच्छा व्यक्त केली होती. ती येथील नगरपरिषदेने बहुमताने मान्य केल्याने यावेळी
त्यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे आभार मानले. स्व. खासदार
राजीव सातव हे सर्वसामान्य जनतेचे नेते होते. त्यांनी सतत हिंगोलीचे प्रश्न,
समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वांना बरोबर घेवून त्यांनी हिंगोलीमध्ये
शासकीय वसतीगृहे, उपजिल्हा रुग्णालये आदी विकासांची कामे केली आहेत. या
वास्तूंच्या माध्यमातून स्व. खासदार राजीव सातव सदैव आपल्यामध्येच राहतील, असे
सांगून या नाट्य सभागृहातील विविध पायाभूत विकास कामे करण्यासाठी लागणारा निधी
मागणीनुसार उपलब्ध करुन दिला जाणार असून
तसा प्रस्ताव नगरपरिषदेने पाठवावे, असे सांगितले.
यावेळी
नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त
केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे
यांनी सदर नाट्यसभागृह हे विशेष
वैशिष्यपूर्ण ठोक तरतूदीतून उभारण्यात आले असून स्व. खासदार राजीव सातव यांच्या
विकास कामाची आठवण जनमाणसात राहण्यासाठी नगरपरिषदेमार्फत थोडासा प्रयत्न करण्यात
आल्याचे सांगितले.
सुशोभिकरणाअंतर्गत तयार करण्यात
आलेल्या कारंजाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
यावेळी
नगरपरिषदेने उभारण्यात आलेल्या अग्रसेन महाराज चौक, गांधी चौकात बसविण्यात आलेल्या
सुशोभीकरणाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कारंजाचे शालेय शिक्षणमंत्री तथा
पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्यासह
नागरिकांची उपस्थिती होती.
*******
No comments:
Post a Comment