30 September, 2021

 विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला कळवावे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सर्वदूर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिके शेतात उभी आहेत, तर काही पिकाची काढणी सुरु आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्सखलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. तसेच काढणी पश्चात नुकसान या जोखमेअंतर्गत देखील वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. फळ पिकविमा धारक शेतकऱ्यांना देखील वेगाचा वारा व गारपीट या बाबीसाठी वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते.

यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची सूचना सर्व प्रथम प्राधान्याने Crop insurance (पिक विमा) मोबाईल ॲपद्वारे, pmfby.maharashtra@hdfcergo.com या ई-मेलवर,  18002660700 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन अशा विविध पध्दतीने आपल्या पिकाचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना पिक विमा कंपनीस द्यावी. ॲपद्वारे दिलेल्या अर्जाची पुष्टी करुन संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे डॉकेट आयडी मिळेल. या आयडीद्वारे शेतकऱ्यांना अर्जाची सद्यस्थिती ॲपद्वारेच पाहता येईल.

ऑनलाईन पध्दतीने पूर्वसूचना देण्यास अडचणी येत असल्यास ऑफलाईन पध्दतीने सदर आपत्तीची माहिती संबंधित बँक, कृषि विभाग, महसूल विभाग यांना देण्यात यावी. आपण दिलेली माहिती बँक, संबंधित विभागाकडून विमा कंपनीस तात्काळ पुढील 48 तासात पाठवण्यात येईल.

Crop insurance (पिक विमा) मोबाईल ॲप Google play Store (गुगल प्ले स्टोअर) वर उपलब्ध असून मराठी भाषेमध्ये माहिती भरता येणे शक्य असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अशांनी प्राधान्याने ॲपद्वारे नुकसानीची सूचना नोंदवावी व अधिक माहितीसाठी श्री.दराडे, जिल्हा प्रतिनिधी, HDFC Ergo मो.क्र. 9518513411 यांच्याशी संपर्क साधावा किंवा नजीकच्या तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस.ए. घोरपडे यांनी केले आहे.

*******

No comments: