23 September, 2021

 


कोविडमुळे पालक गमावलेल्या बालक व विधवांना

मिशन वात्सल्य योजनेचा लाभ देण्यासाठी माहिती सकंलीत करावी

                                        --- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि.23 :  कोविडमुळे पालक गमावलेल्या प्रत्येक बालकांला तसेच विधवा महिलांना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरावरील माहिती संकलित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत दिल्या.  

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा कृती दलाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कृती दल सदस्य सचिव विठ्ठल शिंदे , जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक सरस्वती कोरडे, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बालकांना शालेय पुस्तके, गणवेश मिळतो का याची माहिती घ्यावी व प्रत्येक बालकांच्या शाळेची फी, गणवेश, पुस्तके घेण्यासाठी अनुज्ञेय लाभ देण्यात यावा. तसेच या सर्व विधवा महिलांना छोटे-छोट उद्योग उभारुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी समुपदेशन करावे व विधवा महिलांची यादी कौशल्य विकास विभागाला देऊन त्यांना आवड असलेल्या विषयावर  प्रशिक्षण देण्यात यावे. तरुण विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी समुपदेशन करावे. मिशन वात्सल्य योजनेतील सर्व योजनांचा लाभ किती जणांना दिला आहे याची तालुकास्तरीय समितीकडून मागविण्यात यावी, अशा सूचना  दिल्या.

या बैठकीत कोविड-19 आजारामुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या 145 बालके असल्याची माहिती दिली. यामध्ये एक पालक गमावलेली बालके 142 असून त्यात आई गमावलेली बालके 17, वडील गमावलेली बालके 125 आहेत. तर दोन्ही पालक गमावलेली बालके 03 अशी एकूण 145 बालके आहेत. या बालकांपैकी 142 बालकांचे जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत सामाजिक तपासणी अहवाल पूर्ण करुन त्यांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले आहे. तसेच यापैकी 114 बालकांचे बालसंगोपन योजनेचे आदेश निर्गमित करुन या सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना समुपदेशन करण्यात आले आहे. ज्या बालकांना शैक्षणिक फी आहे अशा 11 बालकांची शालेय फीची माहिती घेऊन पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तांना पाठविण्यात आली आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत जिल्ह्यातील कोविड-19 मुळे विधवा झालेल्या 143 महिलांची माहिती तालुकानिहाय संबंधित तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कृती दलाचे सदस्य तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली.

******

No comments: