तिसऱ्या लाटेला
थांबविण्यासाठी लसीकरण आवश्यक
-- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड
हिंगोली,
(जिमाका) दि. 17 : संभाव्य
येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणावर लसीकरण करण्यावर
भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या
पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती
सभागृहात अतिवृष्टी व कोविड सद्यस्थितीबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय
दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवशी यांची उपस्थिती
होती.
यावेळी बोलताना
पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, संभाव्य तिसऱ्या लाटेला
थांबविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणावर लसीकरण वाढविणे आवश्यक आहे. यासाठी प्राधान्य
देवून शहरी भागात, बाजाराच्या ठिकाणी शिबीरे घेऊन लसीकरण व आरटीपीसीआर तपासणी
करण्याबाबत सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
अतिवृष्टीमुळे
बाधित झालेल्या शेती व घरांचे पंचनामे करुन त्यांना तात्काळ मदत तसेच पुरात वाहून
मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबांना सानुग्रह मदत देण्यात यावी. मयत झालेल्या
जनावरांच्या पाल्यांना अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी
त्यांनी केल्या. सर्व बँकानी पीक कर्ज जास्तीत जास्त प्रमाणात वितरण करण्यात यावे.
तसेच बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व अन्य विविध योजनाचा लाभ
देण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी व सर्वसामान्याची अडवणूक होणार नाही, याची
दक्षता घेण्याचे पालकमंत्री वर्षाताई यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी
उपाययोजनाची माहिती तसेच लसीकरण व आरटीपीसीआर तपासणीची सद्यस्थितीची माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी जिल्ह्यात झालेल्या
पर्जन्यमानाची व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच लीड बँकेचे
अधिकारी श्री. सावंत यांनी पीक कर्जाबाबतची माहिती दिली.
प्रारंभी
पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या बैठकीस
विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment