कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेवून गणेशोत्सव साजरा करावा
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 01 : संभाव्य तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची
काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करावा. तसेच खबरदारी म्हणून कमीत कमी गणेश मूर्तीची
स्थापना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिपीसी सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या
बैठकीत जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक
पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप
विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले की, डेंग्यू, मलेरिया आणि कोविडच्या लक्षणात जवळपास साम्य आहे.
त्यामुळे कोविडची तपासणी केल्याशिवाय कोविडची बाधा झाल्याचे लक्षात येत नाही.
त्यामुळे सर्दी, फडसे आलेल्या मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या ठिकाणी जाण्याचे
टाळावेत. प्रत्येक मंडळाच्या सदस्यांनी आपल्यामुळे कोविडमध्ये वाढ होणार नाही याची
खबरदारी घ्यावी. आपले कुटुंब, नातेवाईक यांचे रक्षण करावे. याची सुरुवात आपल्या
घरापासूनच करावी आणि सर्वांनी जबाबदारीने
गणेशोत्सव साजरा करावा. मंडळाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या
कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करावे.
कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी
श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी 04 फुट व घरगुती गणपती 02
फुटांच्या मर्यादेत प्रतिष्ठापणा करावी. सार्वजनिकरित्या गणपती न बसवता घरच्या
घरीच पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना करावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना
भाविकांसाठी फेसबुक लाईव्ह, केबल तसेच अन्य सोशल मिडीयाचा वापर करुन थेट प्रक्षेपण
करावे. जेणेकरुन भक्तांना घर बसल्या दर्शनाचा लाभ घेता येईल.ऑनलाईन माध्यमातून
प्रक्षेपण करावे. गणेशाच्या मूर्ती इको फ्रेंडली असाव्यात. यासाठी गणेश मंडळांनी
पुढाकार घ्यावा. आगमन व विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटुंबियांचे
कोरोना साथीच्या रोगापासून संरक्षण करावे, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी
सांगितले.
गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार
आहेत. शक्यतो श्रीगणेशाचे विसर्जनही घरच्या घरीच करावे. तर नागरी भागातील विसर्जन
हे नगर पालिकेमार्फत आपल्या वार्डात विशेष गाडीच्या मार्फत करण्यात येणार असून जिल्ह्यातील
सर्व नागरिकांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करुन आपले एक जबाबदार नागरिक
असल्याचे कर्तव्य पार पाडावे व गणेशोत्सव, गौरी पूजनच्या अनुषंगाने गर्दी न करता
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या व गौरीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सुचनानुसार
गणेशोत्सव साजरा करावा. कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी जिल्ह्यातील सर्व गणेश
मंडळांनी श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी 04 फुट व घरगुती गणपती
02 फुटांच्या मर्यादेत प्रतिष्ठापणा करावी व अत्यंत साध्या पध्दतीने गणेशोत्सव
साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन अशा
कोणत्याही प्रकारच्या मिरवणूकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. पर्यावरण नियंत्रण
मंडळाने किंवा इतर प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मापदंडाचे उल्लंघन करीत फटाक्याचा
वापर करुन ध्वनी किंवा हवेचे प्रदुषण करण्यास प्रतिबंध असेल. सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी तिर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन
करण्यात येवू नये. मंदिर परिसर, विसर्जनाच्या ठिकाणी, गणेश उत्सवाच्या ठिकाणी
गर्दी होऊ नये म्हणून कलाकारांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी परवानगी राहणार
नाही. तसेच गणेशोत्सवानिमित्त कोरोना नियमांचे पालन करुन विविध आरोग्य उपक्रम,
स्वच्छता, ध्वनी प्रदूषण, इको फ्रेंडली गणेशाची स्थापना, रक्तदान अशा सामाजिक
उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक
पोलीस स्टेशनमधून तीन गणेश मंडळाची निवड करुन त्यांचा सत्कार करण्यात येणार
असल्याची माहिती दिली.
प्रारंभी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव
दि. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर, 2021 या कालावधीत साजरा होत आहे. या
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती
बैठकीत उपस्थित सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना दिली. सहायक पोलीस अधीक्षक यतीष
देशमुख यांनी आभार मानले.
या बैठकीस तहसीलदार, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व पंचायत
समितीचे गटविकास अधिकारी, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्यातील गणेश मंडळाचे
पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment