29 September, 2021

 

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्याकडून आढावा

नुकसानग्रस्त क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात दि. 27 व 28 सप्टेंबर, 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान ग्रस्त शेत जमिनीचे तात्काळ पंचनामे करावेत, तसेच आजतागायत मयत जनावरे यांची नुकसान भरपाई करण्यासाठी शासनास निधीसाठी मागणी प्रस्ताव सादर करावा आणि रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींचे झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करुन त्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी शासनास सादर करावी, अशा सूचना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.

आज ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीचा पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक इत्यादी अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दि. 27 सप्टेंबर व 28 सप्टेंबर,2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने झालेले शेत जमिनीचे नुकसान, पिकांचे नुकसान, पंचनाम्याची सद्यस्थिती, अतिवृष्टीने रस्ते, पूल, शासकीय इमारतींचे झालेले नुकसान, तलावांची सद्यस्थिती, महावितरण विभागाचे झालेले नुकसान, अतिवृष्टीत पुराने मयत झालेल्या व्यक्तींची, जनावरांची संख्या, अतिवृष्टीने घरांची झालेली पडझड, संपर्क तुटलेले गावे, पुराने वेढलेले गावे इत्यादी विषयावर आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दि. 27 सप्टेंबर ते दि. 28 सप्टेंबर, 2021 या कालावधीत एकूण नुकसान ग्रस्त शेत जमीन अंदाजे क्षेत्र 2 लाख 4 हजार 224 हे.आर. इतक्या क्षेत्राचे नुकसान झाल्याचे आणि माहे जून 2021 ते आजतागायत एकूण नुकसान ग्रस्त शेत जमीनक्षेत्र अंदाजे 2 लाख 13 हजार 277 हे.आर. इतक्या क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती दिली. तसेच दि. 27 सप्टेंबर ते दि. 28 सप्टेंबर, 2021 या कालावधीत एकही व्यक्ती मयत नसल्याचे व 01 जनावर मयत झाल्याची आणि माहे जून, 2021 ते आजतागायत एकूण 15 व्यक्ती व 38 जनावरे  मयत झाले असल्याची माहिती दिली. यासोबतच रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींचे झालेल्या नुकसानीची देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी माहिती दिली.

*****

No comments: