31 July, 2023

 

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी

3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत होती. मात्र राज्यामध्ये कोकण व विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये माहे जुलै, 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खंडीत वीजपुरवठा, खंडीत इंटरनेट सेवा, पीएमएफबीआय पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार व सीएससी सर्व्हर मधील व्यत्यय, राज्याच्या भूमिअभिलेख पोर्टलच्या तांत्रिक सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने दि. 31 जुलैच्या निर्देशानुसार योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी आता ही मुदत 3 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढविण्यात आली असून अद्यापही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांनी या कालावधीत आपल्या पिकांचा विमा उतरविण्याचे आवाहन कृषि आयुक्त यांनी केले आहे.

केवळ एक रुपया भरुन पीएमएफबीवाय पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकऱ्यांनी तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शूरंस ॲप व सामुहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पिक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

*****

 

महसूल सप्ताहानिमित्त विविध लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी व यात लाभधारकांचा सकारात्मक सहभाग वाढावा. तसेच नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी 1 ऑगस्ट महसूल दिनापासून ते दि. 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, हिंगोली येथे मंगळवार, दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी दरवर्षीप्रमाणे महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून दि. 1 ऑगस्ट रोजी  कार्यक्रमाचा शुभारंभ, 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद, 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट रोजी महसुली अधिकारी कर्मचारी  संवाद तसेच दि. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे.          

याच धरतीवर हिंगोली उपविभागात दि. 2 ऑगस्ट, 2023 रोजी हिंगोली तहसील कार्यालयात महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, सेवाबाबत तसेच पुढीलप्रमाणे नागरिकांच्या अडचणी व तक्रारीचा निपटारा करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून खालील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तहसीलदार व नगर भूमापन अधिकारी यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 खाली दुरुस्तीचे अहवाल 1 मध्ये असणारे सातबारा बाबत प्रकरणांचा निपटारा, महाराजस्व अभियानातील गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम, दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वय, वर्ष व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र इत्यादी शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले/प्रमाणपत्राचे वितरण, अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय, निमशासकीय , शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने विशेष मोहिम, पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत अवकाळी पाऊस/अतिवृष्टी/पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घराचे , शेतीचे , फळबागाचे, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार बाधित नागरिकांना देय असलेल्या सोयीसुविधा, नुकसान भरपाई पात्र नागरिकांना लाभ देणे, तसेच खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचा विमा उतरविण्यासाठी अर्जदारांच्या मागणीनुसार सातबारा, आठ अ असे तलाठी स्तरावरुन देय असलेले विविध दाखले, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पुनर्वसनाच्या अनुषंगाने महसूल कार्यालयाशी संबंधित अडचणीचे निराकरण, महसूल अदालत, प्रलंबित फेरफार, पाणंद रस्ते मोकळे करणे, रस्त्याच्या तक्रारीचे निराकरण करणे, सलोखा योजना, गावा-गावातील व शेतातील रस्त्याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन, जमिनीविषयक आवश्यक असणाऱ्या नोंदी अद्यावत करण्याबाबत प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज निकाली काढणे, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागामध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे , महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे निर्गमित करणे, संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा, महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे, ज्येष्ठ नागरिक प्रकरणे, पुरवठा विषयक विविध लाभ व तक्रारींचे निराकरण, विविध अर्थसहाय्य योजनांचा पात्र लाभार्थी यांना लाभ देणे (संगायो/इंगायो/श्रावणबाळ योजना). मतदार नोंदणी विशेष उपक्रम, भूसंपादन विषयक प्रकरणे, तक्रारी निकाली काढणे, वन हक्क प्रकरणांच्या तक्रारी निकाली काढणे याप्रमाणे महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, सेवाबाबत तसेच नागरिकांच्या अडीअडचणी व तक्रारीचा निपटारा करण्यासाठी दि. 2 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 10.30 पासून समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली तालुक्यातील या शिबीरास नागरिकांनी उपस्थित राहून त्यांची कामे, लाभ, तक्रारीचे निराकरण करुन घेण्याचे आवाहन उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

 युरिया खत उपलब्ध असतांना विक्री करण्यास मनाई केल्यास

शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षकाशी त्वरीत संपर्क साधावा

  • सोयाबीन पिकासाठी युरिया खताचा वापर टाळावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : खरीप हंगाम 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पीक पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत पिकांची कायीक वाढ जोमाने होत असून पाऊस उघडल्यामुळे वापसा होताच अंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच शेतकरी पिकांना खतांची मात्रा देखील देत आहेत. त्यामुळे बाजारात युरिया खताची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत बाजारात विविध ग्रेडच्या खतांची आवश्यकतेनुसार उपलब्धता असून शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांसाठी पेरणीपश्चात युरिया खताचा वापर टाळावा, अशी शिफारस कृषि विद्यापीठाने केलेली आहे. युरियाचा वापर केल्याने पिकांची कायीक वाढ आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात होते. पाने लुसलुशीत होतात. त्यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पर्यायाने किटकनाशकांची फवारणी करणे अनिवार्य होते. त्यामुळे उत्पादनावरील खर्च वाढतो, पर्यायाने उत्पादन व नफा या दोन्हीमध्ये घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी युरिया खताचा वापर टाळावा, असे आवाहन केले आहे.

मागील 2-3 दिवसांत IFFCO कंपनीचा 415 मेट्रिक टन व RCF कंपनीचा 432.765 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा हिंगोली जिल्ह्यात झाला आहे. या व्यतिरिक्त युरियाचा संरक्षित केलेला 600.16 मे.टन साठा विक्रीसाठी खुला केलेला आहे. तसेच येत्या 2-3 दिवसांत हिंगोली जिल्ह्यामध्ये RCF कंपनीची पूर्ण रैंक 2600 मे.टन व चंबल फर्टीलायझर्स कंपनीचे 415 मे.टन असे एकूण 2900 मे.टन युरियाचा हिंगोली जिल्ह्यामध्ये पुरवठा होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत जेवढा युरिया आवश्यक आहे. तेवढाच युरिया खरेदी करावा. जेणेकरुन उपलब्ध युरिया सर्व शेतकऱ्यांना पुरेसा होईल, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्याची युरिया खताची मागणी, मंजुर आवंटन, आजपर्यंत झालेला पुरवठा, विक्री व शिल्लक (मे.टन) दर्शविणारा तपशील खालील प्रमाणे आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी खरीप 2023 मध्ये 22057 मेट्रिक टन युरिया खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 16151 मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे. आतापर्यंत 14620.17 मेट्रिक टनचा पुरवठा करण्यात आला आहे. यापैकी 11625 मेट्रिक टन युरिया खताची विक्री करण्यात आली असून 2995 मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. शिल्लक युरिया सर्व शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी किरकोळ खत विक्रेत्यांनी सद्यस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त युरियाची विक्री करु नये. तसेच MRP पेक्षा जादा दराने आणि युरिया सोबत इतर अनावश्यक कृषि निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करु नये. तसे निदर्शनास आल्यास संबंधित कृषि निविष्ठा विक्रेत्याविरुध्द परवाना निलंबन / रद्द अशा स्वरुपाची कठोर कारवाई करण्यात येईल.

किरकोळ विक्रेत्याकडे युरिया खत उपलब्ध असतांना शेतकऱ्यांना विक्री करण्यास मनाई केल्यास अथवा जादा दर आकारत असल्यास किंवा इतर कृषि निविष्ठांची सक्ती करीत असल्यास शेतकऱ्यांनी खाली नमूद तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षकाशी त्वरीत संपर्क साधावा.

औंढा नागनाथ तालुक्यासाठी गुण नियंत्रण निरीक्षक एस. के. शिवणकर असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 8087889299 असा आहे. वसमत तालुक्यासाठी आर. एम. गवळी असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 7038473903 असा आहे. हिंगोली तालुक्यासाठी आर. एन. पुंडगे हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405323058 असा आहे. कळमनुरी तालुक्यासाठी एस. ए. ताडेवाड हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9028905357 असा आहे. सेनगाव तालुक्यासाठी पी. पी. गाडे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9158121718 असा आहे. 

***** 

 

कळमनुरी तालुक्यातील कोतवाल भरती निवड प्रक्रियेदरम्यान

उमेदवारांनी कोणाच्याही भूलथापाना किंवा प्रलोभनाला बळी पडू नये

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : तहसील कार्यालय कळमनुरी कार्यालयाच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गीय रिक्त पदासाठी जाहिरात देऊन रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तालुका निवड समितीमार्फत चालू आहे. ही प्रक्रिया दि. 25 जुलै ते दि. 8 सप्टेंबर, 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया परिक्षार्थीच्या गुणवत्तेच्या आधारे पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे.  या निवड प्रक्रिया दरम्यान कळमनुरी तालुक्यातील उमेदवारांनी, नागरिकांनी कोणाच्याही भूलथापाना किंवा प्रलोभनाला बळी पडू नये.

या निवड प्रक्रियेत निवड करण्यासाठी कोणाही पैशाची मागणी करीत असेल किंवा नौकरी लावण्याचे अमिष दाखवित असेल तर अशा उमेदवारांनी, नागरिकांनी पोलीस स्टेशन कळमनुरी (मो.9011288100) व आखाडा बाळापूर (मो.9881442028) तसेच तहसील कार्यालय कळमनुरी (नायब तहसीलदार महसूल-1 मो. 9922023191) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार, कळमनुरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

******

 

फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

2 ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 31  :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतीसाठी फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 8 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 2 ऑगस्ट, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी किसन धावे (मो.9370631461), कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

***** 

 गोदाम बांधकाम अनुदानासाठी इच्छूक शेतकरी उत्पादक कंपनीनी अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : विविध केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असुन इच्छुक शेतकरी उत्पादक संघ कंपनी यांनी अर्ज सादर करावेत.

यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाईन/स्पेसिफिकेशन खर्चाचे अंदाज पत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषिमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारुन करावा. याबाबत शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड हमीपत्र आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इ. कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी/मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबर 2023 पूर्वी सादर करावेत. पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी/संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पद्धतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उत्पादक संघ कंपनी यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

 

एकात्मिक अन्नद्रव्य व कीड नियंत्रण निविष्ठांच्या अनुदानासाठी अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : विविध केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत पिकांसाठी सन 2023-24 या वर्षासाठी खरीप व रब्बी अंतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक किड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे / तणनाशके/ जिप्सम जैविक खते/ जैविक किड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित लाभ देय आहे.

सध्या खरीप हंगामातील पिकांवर किड रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान सन 2023-24 मध्ये उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक-प्रकल्पाबाहेरील या बाबीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.

सूक्ष्म मुलद्रव्ये, जिप्सम, जैविक खते एकूण किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये या मर्यादेत कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी देय आहे. तसेच पिक संरक्षण औषधे/तणनाशके/ जैविक किड नियंत्रण निविष्ठा इ. किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये हेक्टर अनुदान देय आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती, सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इ. कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी / मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे खरीप हंगामासाठी दि. 15 सप्टेंबर, 2023 पूर्वी सादर करावेत व रब्बी हंगामासाठी दि. 30 डिसेंबर, 2023 पूर्वी सादर करावेत. त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

 

सर्व महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे

तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत

अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयावर होणार फौजदारी कारवाई

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सन 2021-22 या वर्षापासून शिष्यवृत्ती रक्कम महाविद्यालयास प्राप्त न झाल्याने महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे देण्यास नकार दिल्याच्या अनेक तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत, ही बाब ही उचित नाही. शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या  मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची शिक्षण फी वसूल करण्यात येऊ नये, तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुद्ध फौजदारी स्वरुपाची  कार्यवाही करण्यात येईल.

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांबाबत शासन निर्णयान्वये सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी शिष्यवृत्तीच्या एकूण रकमेच्या 60 टक्के रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यावर व 40 टक्के रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा तसेच विद्यार्थ्यांचे बँक खात्यावर जमा झालेली रक्कम निर्वाह भत्ता वजा जाता महाविद्यालयास देय असलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्यांनी 7 दिवसांचे आत महाविद्यालयास हमीपत्र घेऊन  जमा करणेबाबत निर्णय शासनाने घेतला आहे. सन 2021-22 पासून केंद्र शासनाने केंद्र हिश्याच्या (60 टक्के) सुधारित केलेल्या शिष्यवृत्तीच्या वितरण पध्दती विरुध्द राज्यातील महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला असून मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेल्या आहेत. ही प्रकरणे अद्यापही मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे निर्णयासाठी प्रलंबित आहे.

सन 2021-22 या कालावधीतील केंद्र हिश्याच्या 60 टक्के शिष्यवृत्ती रक्कमेबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे शासन निर्णय, परिपत्रके व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांनुसार जिल्हास्तरावरुन कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच याबाबत जिल्हयातील सर्व महाविद्यालयांना यापूर्वीच आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तरीही महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क भरण्यासाठी सतत तगादा लावत असलेबाबत तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यास अडवणुक करीत असल्याची बाब सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या निदर्शनास आलेली आहे.

शैक्षणिक कागदपत्रांअभावी विद्यार्थ्याचे शैक्षणिक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयावर निश्चित करण्यात येईल, याची गांर्भीयपूर्वक नोंद घ्यावी. तसेच ज्या महाविद्यालयांबाबत  मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या कागदपत्रांची अडवणुक केल्याची तक्रार कार्यालयास प्राप्त होतील /झाल्यास अशा महाविद्यालयाविरुध्द अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमान्वये अधिनियम 1989 अन्वये कार्यवाही करण्यात येईल.

सर्व महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे तात्काळ विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे , सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली केले आहे.

******

 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाचे आयोजन

विविध लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी व यात लाभधारकांचा सकारात्मक सहभाग वाढावा या उद्देशाने 1 ऑगस्ट महसूल दिनापासून जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी दरवर्षीप्रमाणे महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते होणार आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.          दि. 1 ऑगस्ट रोजी  कार्यक्रमाचा शुभारंभ, 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद, 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट रोजी महसुली अधिकारी कर्मचारी  संवाद तसेच          दि. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महसूल सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे, लोकांची महसूल विषयक विविध कामे, सैनिकांची विविध कामे, यासाठी वेगवेगळ्या स्तरावर उपक्रमाचे आयोजन करुन जनसहभागाद्वारे लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

******

28 July, 2023

 निर्यातबंधु योजनेंतर्गत एकदिवशीय कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन


हिंगोली, (जिमाका) दि. 28: जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या निर्यात क्षमता वृध्दीसाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकार यांचेमार्फत निर्याबंधु योजनेंतर्गत एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त महासंचालक (DGFT) नागपूर स्नेहल ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 31 जुलै, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजीत करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेत निर्यात बंधु, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल आणि मेक इन इंडिया, IEC रजिस्ट्रेशन, कस्टम प्रोसिजर, MSME Scheme, ई-कॉमर्स बाबत सविस्तर व्हिडिओ सादरीकरण करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यशाळेबाबत जिल्ह्यातील सर्व निर्यातदार फार्मर प्रोड्युसर कंपनी सर्व औद्योगिक संघटना, निर्यात इच्छुक उद्योजक, नवउद्योजक यांनी उपस्थित राहूण लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोलीचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

 हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 412 मिमी पावसाची नोंद


हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 41.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 411.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 51.74 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 28 जुलै, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 18.60 (444.60) मि.मी., कळमनुरी 60.70(459.70) मि.मी., वसमत 94.20 (442.60) मि.मी., औंढा नागनाथ 9.40 (395.20) मि.मी, सेनगांव 10 (301.20) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 411.50 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

 खरीप हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 

राज्यांतर्गत पिकस्पर्धेचे आयोजन 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत  प्रोत्साहन देऊन गौरव  केल्यास त्यांचे  मनोबल  वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


या पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे. 

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील.  

स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या  नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर)  क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची  आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : 

विहित नमुन्यातील अर्जासोबत (प्रपत्र-अ)  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास),  पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. 

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरुप : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षीस 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे बक्षीस 7 हजार, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये आहे. 

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. 

*****

26 July, 2023

 

आरओ इलेक्ट्रीशियन ॲन्ड मेंटेनन्स या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

4 ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने हिंगोली तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतीसाठी आरओ इलेक्ट्रीशियन ॲन्ड मेंटेनन्स या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 8 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 4 ऑगस्ट, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सुभाष बोरकर, कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

*****

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचे

दि. 27 जुलै रोजी पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

वेबकास्ट लिंकचा वापर करुन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे.

दिनांक 27 जुलै, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजन (PMKISAN) अंतर्गत चौदाव्या हप्त्यातील (एप्रिल, 2023 ते जुलै, 2023) देय्य लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे. या समारंभास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर,  केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या समारंभामध्ये कृषि विज्ञान केंद्रावर (KVK) https://pmindiawebcast.nic.in या लिंक चा वापर करुन परिसरातील शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी https://pmevents.ncog.gov.in या वेबकास्ट लिंकचाही वापर करता येईल. या कार्यक्रमास राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल वरुन ऑनलाईन सहभागी व्हावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौदाव्या हप्त्याची हस्तांतरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे . 

माहे फेब्रुवारी, 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत दिनांक 25 जुलै, 2023 अखेर 110.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 23731.81 कोटी रक्कमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे.

दि. 27 जुलै, 2023 रोजीच्या समारंभात दिनांक 1 एप्रिल, 2023 ते दिनांक 31 जुलै, 2023 या कालावधीकरिता देय्य चौदाव्याप्त्यावेळी महाराष्ट्र राज्यातील एकू85.66 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण 1866.40 कोटी रुपयाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. खरीप, 2023 हंगामात विविध कृषी निविष्ठा खरेदीसाठी चौदाव्या हप्त्याचा हा लाभ शेतकऱ्यांना उपयुक्त ठरुन कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे.  

या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील 88.92 लाख लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न लाभ अदायगीसाठी नोंदणीकृत झाले आहेत. उर्वरीत सर्व लाभार्थी यांनी PM KISAN योजनेचा लाभ जमा होण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी संबंधित बँकेत जाऊन आवश्यक अर्ज बँकेत सादर करुन आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

****

 

खरीप हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी

राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत  प्रोत्साहन देऊन गौरव  केल्यास त्यांचे  मनोबल  वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :

·         पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे.

·         स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील. 

·         स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या  नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

·         पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर)  क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

·         पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची  आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :

विहित नमुन्यातील अर्जासोबत (प्रपत्र-अ)  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास),  पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरु : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षीस 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे बक्षीस 7 हजार, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये आहे.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन सुनील चव्हाण, आयुक्त कृषी यांनी केले आहे.

*****