जिल्हा ग्रंथालयात ई-ग्रंथालय प्रणालीचे उद्घाटन
ई-ग्रंथालय प्रणाली वाचकांसाठी एक आधुनिक पर्वणी
- सुनिल हुसे
हिंगोली (जिमाका), दि.
18 : ई-ग्रंथालय प्रणाली
वाचकांसाठी एक आधुनिक पर्वणी असल्याचे सांगून या प्रणालीमुळे वाचकांचा व कर्मचाऱ्यांचा
वेळ वाचून ग्रंथ देवघेव सुलभ व जलद गतीने होण्यास
मदत होईल. यासाठी आधुनिकतेची कास पकडून सर्व ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन
आपल्या ग्रंथालयीन सेवा आधुनिक करावेत, असे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे सहायक ग्रंथालय
संचालक सुनिल हुसे यांनी केले.
येथील जिल्हा ग्रंथालयात एनआयसीमार्फत ग्रंथालयीन
सेवेसाठी तयार करण्यात आलेली ई-ग्रंथालय प्रणाली प्रस्थापित करण्यात आली आहे. या ई-ग्रंथालय
प्रणालीचे उद्घाटन औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते
करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, मुपकलवार,औरंगाबाद
विभाग ग्रंथालय संघांचे कार्यवाह संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद
सोनकांबळे, शंभु दुभोलकर, दिगंबर झुंजारे, नागनाथ लटपटे, विनोद कावडे, डोंगरे वाचक
व ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे
जनक पी. एन. पणीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित वाचन दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच
प्रणालीमार्फत सारंग घोरपडे या वाचकास ऑनलाईन सभासद ओळख पत्र देऊन प्रणाली मार्फत ग्रंथाचे
वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला . तसेच वाचनालयातील नियमित वाचकांचा ग्रंथ भेट देऊन
सत्कार करण्यात आला.
शासकीय ग्रंथालयात सुमारे 45 हजार ग्रंथ उपलब्ध
असून वाचकांनी मोठ्या प्रमाणात सभासद होऊन ग्रंथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी यावेळी
केले.
*****
No comments:
Post a Comment