19 July, 2023

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज योजनेत

 जिल्ह्यातील 501 लाभार्थ्यांना 30 कोटी 64 लाख 91 हजाराचे कर्ज मंजूर

 

  • आतापर्यंत 438 लाभार्थ्यांना 3 कोटी 73 लाख 10 हजार 635 रुपयाचा दिला व्याज परतावा
  • जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 19 : राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांचे व्याज शासन भरत आहे. महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे.

या महामंडळामार्फत वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेत आतापर्यंत एकूण 2383 नोंदणीकृत अर्जदारापैकी पात्रता प्रमाणपत्र प्राप्त 1323 अर्जदार आहे. यापैकी 501 लाभार्थ्यांना 30 कोटी 64 लाख 91 हजार 557 रुपयाचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या 501 लाभार्थ्यापैकी 441 लाभार्थ्यांना महामंडळाकडून व्याज परतावा मंजूर झालेला असून 438 लाभार्थ्यांना आतापर्यंत 3 कोटी 73 लाख 10 हजार 635 रुपये व्याज परतावा केला आहे.

            तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 28 गटांनी अर्ज केला आहे. यापैकी 12 गटांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले आहे. तर बँकेने 10 लाभार्थी गटांचे कर्ज मंजूर केले आहे. या सर्व 10 गटांना आजपर्यंत 19 लाख 51 हजार 15 रुपयाचा व्याज परतावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.

            अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही तोपर्यंत कार्यवाही करता येत नाही.

महामंडळाच्या योजना :

            1) वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेची मर्यादा 10 लाखाहून 15 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आलेली असून महामंडळामार्फत साडेचार लाख रुपयाच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येईल. याचा व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्षे व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. 12 टक्के असेल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे व ते फक्त व्यवसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे. मात्र दि. 20 मे, 2022 पूर्वीच्या लाभ धारकांना नियमानुसार 10 लाख रुपयाच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून त्यासाठी 3 लाख रुपयाची मर्यादा असेल.

            2) गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकज्र येऊन लाभ घेता येणार आहे. यामध्ये दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लाख रुपयांच्या मर्यादेत, तीन व्यक्तींसाठी 35 लाख रुपयांच्या मर्यादेत, चार व्यक्तीसाठी 45 लाख रुपयांच्या मर्यादेत तसेच पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 रुपयापर्यंतच्या व्यवसाय/उद्योग कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लाख रुपयांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास व हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये एफपीओ गटानी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ भरेल.   

            लाभासाठी अटी व शर्ती : उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी तथा ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशांकरिता आहे. या योजनाचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेची अट स्त्री-पुरुषांसाठी कमाल 60 वर्षे आहे. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे. यासाठी तहसीलदाराचे प्रमाणपत्र किंवा पती व पत्नीचे वैयक्तीक आयअीआर, लाभार्थी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. दिव्यांग व्यक्तीला योजनेंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये कमाल वयाचे बंधन नसेल. गट कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत भागिदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एलएलपी, कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट/संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय/उद्योगासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वरील योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक बालाजी शिंदे यांनी केले आहे.

*******

No comments: