शेतकऱ्यांना प्रधानमंत्री
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी
3 ऑगस्टपर्यंत
मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 31 : राज्य शासनाने
शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा
विमा उतरविण्याची योजना जाहीर केली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी विमा योजनेत सहभागी
होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत होती. मात्र राज्यामध्ये कोकण व
विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये माहे जुलै, 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे
खंडीत वीजपुरवठा, खंडीत इंटरनेट सेवा, पीएमएफबीआय पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार व
सीएससी सर्व्हर मधील व्यत्यय, राज्याच्या भूमिअभिलेख पोर्टलच्या तांत्रिक सेवेतील
व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन
केंद्र शासनाने दि. 31 जुलैच्या निर्देशानुसार योजनेत शेतकऱ्यांना सहभागी
होण्यासाठी आता ही मुदत 3 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढविण्यात आली असून अद्यापही प्रधानमंत्री
पीक विमा योजनेत सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांनी या कालावधीत आपल्या पिकांचा विमा उतरविण्याचे
आवाहन कृषि आयुक्त यांनी केले आहे.
केवळ एक रुपया
भरुन पीएमएफबीवाय पोर्टल https://pmfby.gov.in
वर स्वत: शेतकऱ्यांनी तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शूरंस
ॲप व सामुहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी. अधिक
माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पिक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका
कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी
संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment