इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या
विविध योजनेचा लाभ
घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त
आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी बेरोजगारांसाठी
स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील
गरजु व कुशल व्यवसाईक व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम
उद्योग उत्पादन , व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायसाठी या महामंडळाच्या
हिंगोली जिल्ह्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालय स्तरावरुन खालील प्रमाणे
उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.
1) एक लाख रुपयापर्यंतची थेट कर्ज योजना : यासाठी उद्दिष्ट 100
असून या योजनेमध्ये अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा,
अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे, परतफेडीचा कालावधी
48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहिल. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत
व्याज अदा करावे लागणार नाही, परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर
आकारण्यात येईल.
2) 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना : यासाठी उद्दिष्ठ 46 असून या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची
असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील . 20 टक्के रक्कम ही
महामंडळाची असून त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारण्यात येते व 5 टक्के सहभाग हा
लाभार्थ्यांचा आहे. या योजनेची कर्ज मर्यादा रुपये पाच लाखापर्यंत असून परतफेडीचा
कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.
3) वैयक्तिक कर्ज व्याज
परतावा योजना : यासाठी उद्दिष्ट 122 असून ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून
कर्ज मर्यादा रुपये 10 लाख पर्यंतची आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
मर्यादा आठ लाख पर्यत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच
कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याज
परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक
खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन
पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. असे
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामडळाचे हिंगोली जिल्हा
व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
4) गट कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेसाठी 13 चे उद्दिष्ट असून
ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी कर्ज मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यंतची
आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे असावे. तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा
किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच इतर मागास प्रवर्गातील
महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या
बचत गट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP,
FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल.
त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला
जाईल.
5) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेसाठी 11 चे उदि्दष्ट
असून ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. कर्जरकमेवरील व्याज परतावा देशांतर्गत
व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 लाख ते 20 लाख रुपये पर्यंतची आहे. या योजनेत
महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे
वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये
असावी. विद्यार्थी बारावी 60 टक्के गुणासह गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज
परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
ही कर्ज योजना बँकेमार्फत
असून लाभार्थ्यांने महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org
या संकेत स्थळावर भरावा. तसेच या योजनेचा लाभ हा इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने
जास्तीत जास्त घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि
विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला
बाजार, हिंगोली-413513, दूरध्वनी क्र्र. 02456-224465, ई-मेल पत्ता : dmobcparbhani@gmail.com
वर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एन. झुंजारे जिल्हा व्यवस्थापक, हिंगोली यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment