10 July, 2023

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमासाठी

हिंगोली जिल्ह्याला 50 लाखाचा निधी

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : मराठवाडा मुक्ती संग्रामास या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 7 जुलै, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये या अमृत महोत्सवासाठी प्रत्येक जिल्ह्याला 50 लाख एवढा निधी वितरीत केला आहे.

हिंगोली जिल्ह्यातही यासाठी बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाने मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवासाठी कोण कोणते कार्यक्रम करायचे आहेत. याबाबतचा आराखडा शासनाला पाठविला होता.  यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करणे, तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नाटिका, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे, मराठवाडा मुक्ती संग्राम चित्ररथ तयार करुन मंडळनिहाय रथयात्रा काढणे, मुक्ती संग्राम संदर्भात छायाचित्रे, पोस्टर्स, भितीचित्रे, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, मुक्तीसंग्रामासंदर्भात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करणे, डिजिटल बोर्ड लावणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्याठिकाणापर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांचा यात समावेश आहे.  

*****

No comments: