हिंगोली, दि. 18 नोव्हेंबर (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना संसर्गमुक्त, शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात आरोग्यसेवा मिळावी. तसेच रुग्णालयातील गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भेटीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यासोबतच व्हिजिटर पास पद्धत लागू करण्यात येणार असून, या नवीन नियमांची अंमलबजावणी 1 डिसेंबर 2026 पासून होणार आहे.
रुग्णालयातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम व गतीमान करण्याच्या दृष्टीने अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी हे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रुग्णांच्या नातेवाईकांना दुपारी १ ते ३ आणि सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेतच रुग्णांना भेटता येणार आहे. निश्चित वेळेव्यतिरिक्त रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना प्रवेश दिला जाणार नाही.
व्हिजिटर पासशिवाय प्रवेश नाही
रुग्ण रुग्णालयात दाखल होताना एका नातेवाईकाला व्हिजिटर पास देण्यात येईल. अत्यवस्थ रुग्णांच्या बाबतीत दोन नातेवाईकांना पास देण्याची व्यवस्था असेल. पासधारक नातेवाईकालाच रुग्णासोबत थांबता येईल. एकाच वेळी एकापेक्षा अधिक नातेवाईकांना रुग्णासोबत थांबण्यास किंवा भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.
नियमांचे पालन करण्याचे अधिष्ठात्यांचे आवाहन
रुग्णांवर वेळेत उपचार करणे, संसर्गाचा प्रसार रोखणे तसेच रुग्णालयात स्वच्छता व शांतता राखणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. नवीन व्यवस्थेमुळे डॉक्टर व परिचारिका कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेवर अधिक लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करून रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment