हिंगोली जिल्ह्यातील ५६ गावांमध्ये भूजल
पुनर्भरण उपाययोजना राबविण्यात येणार
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
पुनर्भरणाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना
हिंगोली, दिनांक 17 (जिमाका) : जिल्ह्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'भूजल पुनर्भरण उपाययोजना' आराखड्याचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत एकूण ५६ गावांमध्ये विविध पुनर्भरणाची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, ती तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात भूजल पूनर्भरणा संदर्भातील आराखड्यांवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.बी.एन.संगनवार, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे जी.एस.खुरजुसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे एस.के.वाळके आदी उपस्थित होते.
बैठकीत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, हिंगोली कार्यालयाच्या वतीने विविध योजनांमधून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ४४ गावांमध्ये ३९२ 'रिचार्ज ट्रेंच कम रिचार्ज शॉफ्ट' उभारण्यात येणार आहेत, तर जिल्हा खनिकर्म निधीतून पाच गावांमध्ये ५६ 'रिचार्ज शॉफ्ट'साठी प्रस्तावित आहेत. तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) २.० अंतर्गत ७ गावांमध्ये ५६ 'रिचार्ज शॉफ्ट'साठी प्रस्तावित करण्यात आल्याचे श्री. संगनगवार यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले. या तिन्ही माध्यमातून जिल्ह्यातील ५६ गावांमध्ये एकूण ३९२ 'रिचार्ज ट्रेंच कम रिचार्ज शॉफ्ट' आणि ११२ 'रिचार्ज शॉफ्ट' अशी कामे केली जाणार आहेत. सद्यस्थितीत या गावांमधील क्षेत्रीय सर्वेक्षण प्रगतीपथावर असल्याचेही श्री. संगनवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment