हिंगोली, दिनांक 18 (जिमाका) : मंजूर ले-आऊटमधील भूखंडांच्या खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांना आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 'कमी-जास्त पत्रक' आणि वैयक्तिक सातबारा उतारा मिळविण्याच्या पूर्ततेसाठी ही मुदतवाढ मिळाली आहे. ही वाढीव मुदत संपल्यानंतर मात्र या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी स्पष्ट माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.
यापूर्वी भूखंडांची नोंदणी करण्यासाठी 'कमी-जास्त पत्रकानुसार' अद्ययावत केलेला स्वतंत्र सातबारा उतारा अनिवार्य करण्यात आला होता. मात्र, भूमी अभिलेख आणि महसूल विभागाकडून हा उतारा मिळवताना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांचा हा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढीचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही मुदतवाढ देताना काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ज्या भूखंडांचे स्वतंत्र सातबारा उतारे तयार नाहीत, त्यांच्या नोंदणीसाठी खरेदीदार आणि विक्रेता यांनी विहित मुदतीत उतारा अद्ययावत करून घेण्याचे हमीपत्र देणे बंधनकारक राहील. तसेच, संबंधित ले-आऊट रीतसर मंजूर असल्याची खात्री दुय्यम निबंधकांनी करणे आवश्यक आहे. याशिवाय, स्वतंत्र सातबारा तयार करण्यासाठी रीतसर अर्ज केल्याची पोचपावती दस्तासोबत जोडावी लागणार असून, ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही सादर करावी लागेल. या तीन महिन्यांच्या वाढीव वेळेत सर्व संबंधितांनी आपले महसुली रेकॉर्ड अद्ययावत करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सह जिल्हा निबंधक यांच्यासह सर्व अधिनस्त कार्यालयांना दिल्या आहेत.
याशिवाय सर्व तहसीलदार यांनी मुदतवाढीच्या कालावधीत आजपर्यंत मंजूर लेआऊटच्या अनुषंगाने भूमि अभिलेखचे उपअधीक्षक यांच्याकडून कमी जास्त पत्रक प्राप्त करून स्वतंत्र सात बारा तयार करण्याची कार्यवाही करावी, भूमिअभिलेखचे सर्व उपअधीक्षक यांनी आजपर्यंत मंजूर अभिन्यासाबाबत नगर रचना विभागाचे सहायक संचालक, तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून मंजूर लेआऊटप्रमाणे कमी जास्त पत्रक लगोलग करण्याची कार्यवाही करावी, याबाबतीत कुठलीही दिरंगाई होणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment