17 November, 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा १९ नोव्हेंबरला

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा १९ नोव्हेंबरला

दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प या विषयावर परिसंवाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती

हिंगोली, दि. १७ (जिमाका) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि 'दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प' या विषयावरील परिसंवाद गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कॅम्ब्रिज चौक मैदान, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सादरीकरण, जलसंधारण, जलसुरक्षा व दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या यशोगाथा मांडण्यात येणार असून, सन २०२५-२६ मधील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना विभागस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: