18 November, 2026

साळवा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली पाहणी

               कामाचा दर्जा व गुणवत्तेशी तडजोड न करता बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश

          हिंगोली, दि. 18 नोव्हेंबर (जिमाका) : कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील जिल्हा परिषद प्रशालेस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल दिनांक 17 नोंव्हेंबर रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निधीतून सुरू असलेल्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची तसेच शाळा परिसरातील पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

        यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शाळेच्या आवारात सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेतली. बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कामाचा दर्जा आणि बांधकामाची प्रगती यांची त्यांनी तपासणी केली. शासकीय निधीतून होणारी विकासकामे दर्जेदार व टिकाऊ असावीत. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बांधकामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

        पाहणीदरम्यान त्यांनी उपस्थित स्थानिक प्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून बांधकामाच्या तांत्रिक बाबींची माहिती घेतली. नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करावे. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले. तसेच, शाळा परिसरातील अन्य पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

No comments: