बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालकांच्या हक्कांबाबत प्रवासी, पालक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन; मदतीसाठी १०९८ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 18 नोव्हेंबर (जिमाका) : बालहक्क सप्ताह १८ ते २७ नोव्हेंबर २०२६ आणि २७ नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृतीपर उपक्रमांना आज प्रारंभ करण्यात आला. हिंगोली बसस्थानकावर प्रवासी, पालक, विद्यार्थी व नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालकांच्या हक्कांविषयी माहिती देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाइन १०९८ कक्षाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपस्थित नागरिकांना बालविवाह ही बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या असल्याचे सांगण्यात आले. बालविवाहामुळे बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विपरीत परिणाम होतो. तसेच सुरक्षित व सन्मानपूर्वक जीवन जगण्याच्या त्यांच्या अधिकारांनाही बाधा पोहोचते, याबाबत प्रबोधन करण्यात आले.
बालविवाहाची माहिती मिळताच १०९८ वर संपर्क साधा
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यात बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास, बालकांवर अत्याचार होत असल्यास किंवा एखादे बालक अडचणीत असल्याचे आढळल्यास तातडीने चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमाला एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, हिंगोली ग्रामीण पुष्पा राठोड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कनिष्ठ तालुका संरक्षण अधिकारी राजेश पांडे, जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, आयसीडीएस पर्यवेक्षिका शारदा मस्के आणि केस वर्कर सूरज इंगळे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment