14 September, 2022

 

पीक कर्जाचे 75 टक्के उद्दिष्ट सप्टेंबर अखेर पर्यंत पूर्ण करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



हिंगोली (जिमाका), दि. 14 : सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2022-23 च्या खरीप पीक कर्जाचे 75 टक्के उद्दिष्ट सप्टेंबर अखेर पर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 13 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक शशीकांत सांवत, आरबीआयचे नरसींग कल्याणकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कदम, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले,  विविध बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, वेळोवेळी पीक कर्जाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करावे. 11 सप्टेंबर पर्यंत 60.77 टक्के पीक कर्जाचे वाटप झालेले आहे. आता सप्टेंबर अखेरपर्यंत 75 टक्के उद्दिष्ट पूर्ण करावेत आणि आपणास देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. तसेच विविध योजनेचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत. यात हयगय करणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायत्ता बचत गटाचे प्रस्ताव 17 सप्टेंबर पर्यंत मंजूर करुन त्यांचे वितरण करावेत. तसेच विविध बँकाच्या नवीन शाखा सुरु करण्याबाबत आढावा घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

******

No comments: