मराठवाडा मुक्तीदिन विशेष :
ब्रिटिश
राजवटीच्या काळात भारतात 563 संस्थाने होते. संस्थानाचा राज्यकारभार देशी संस्थाने पाहत असत.
दक्षिण भारतात हैदराबाद, कोल्हापूर, नागपूर ही संस्थांने असून इ.स. 1724 ते 1948 या कालखंडात हैदराबाद संस्थानात
असफिया घराण्याची सत्ता होती. हैदराबाद राजाचा असफिया घराण्याचा संस्थापक मीर
करीमुद्दिन उर्फ निजाम उल मुल्क हा होता. त्याने इ.स. 1724 मध्ये हैदराबाद या ठिकाणी
स्वतंत्र राज्याची स्थापना केली. यामध्ये आजचा
मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटका या प्रदेशाचा समावेश होता. या राज्यांच्या
गादीवर वंश परंपरेने या सत्ताधीशाला निजाम या नावाने ओळखले जात होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु निजामाने आपले राज्य स्वतंत्र
ठेवण्याची घोषणा केली. निजाम अन्याय व अत्याचारी
होता. याशिवाय देशाच्या मध्यभागी असलेले हैदराबाद हे राज्य स्वतंत्र आणि जनतेच्या हिताचे नव्हते. त्यामुळे हैदराबाद
निझामी सत्तेला हद्दपार करण्यासाठी या राज्यातील जनतेने 7
ऑगस्ट 1947 पासून संघटितपणे सशस्त्र आंदोलनाला सुरुवात
केली. शेवटी 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने लष्करी
कारवाई केली. परिणामी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली. अशा रीतीने
हैदराबाद राज्य भारतीय संघराज्यात सामील झाले .
हैदराबाद मुक्तिसंग्राम हा भारताच्या
स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. दुर्दैवाने या लढ्याचा इतिहास बरेच दिवस
उपेक्षित राहिला. या लढ्याचे अनेक पैलू प्रकर्षाने दुर्लक्षित झालेले दिसून येतात.
हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाडा सर्व क्षेत्रावर आघाडीवर होता. प्राचार्य नरहर
कुरुंदकर म्हणतात- हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यात मराठवाडा अग्रेसर होता. त्यांनी
पुढे सशस्त्र आंदोलनातही आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठवाड्यातील अग्रगण्य
पत्रकार अनंत भालेराव यांच्या मतानुसार - मराठवाड्यातील जनतेने हा प्रश्न समूळ
नष्ट करण्यासाठी व या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मे पत्करण्याची उज्वल
परंपरा निर्माण केली. गोविंदभाई श्राफ यांच्या मते -हैदराबाद स्वतंत्र्य संग्रामाची
परिस्थिती अत्यंत वेधपूर्वक साधरणाने भिन्न भिन्न घटनाक्रमातून वाटचाल करणारी आहे. त्यामुळे संग्रामाचे स्वरुप अद्वितीय असे आहे.
निजाम राजवटीचे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणारे बरेच प्रयत्न मराठवाड्यामधून झाले
आणि निजामाच्या गुलामगिरीविरुद्ध दंड थोपटण्याचे
काम मराठवाड्यातील जनतेने केले आहे. त्या हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात किंवा
मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्यात
हिंगोली जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण
योगदान आपल्याला दिसून येते. त्याचा आढावा पुढीलप्रमाणे.
भाटेगाव येथील रोहिल्यांचा बंदोबस्त
भाटेगाव येथील रोहिल्या
यांच्या साथीदाराच्या मदतीने खेड्यापाड्यातील लोकांना फार त्रास देत असे,
हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीची माहिती पोलिसांना तो देत
असे, रोहिल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेंबाळपिंपरी येथील लष्करी केंद्रावरील विठ्ठलराव नाईक,
माणिकराव टाकळगव्हाणकर, दीपाजी पाटील, रावसाहेब पेडगावकर, मार्तंडराव नाईक, बापूजी मास्तर इत्यादी सैनिकांनी 15 जानेवारी 1948 ला भाटेगावच्या रोहील्यावर
हल्ला केला. त्यावेळी रोहिला येथे
साथीदारासह शेतात झोपला होता. सैनिकांची त्यास चाहूल लागताच त्यांनी गोळीबार करत स्वातंत्र्य
सैनिकांवर हल्ला सुरु केला. त्यात सैनिक व
रोहिला यांच्यात गोळीबारानेच संघर्ष होऊन या गोळीबारात भाटेगावचा रोहिला ठार झाला.
वाकोडी येथे निजामी पोलीस व स्वातंत्र्य सैनिक चकमक
26 मे 1948 रोजी कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावावर हल्ला करण्याकरता
निजामी पोलीस येत असल्याची माहिती
शेंबाळपिंपरी कॅम्पला मिळाली. स्वातंत्र्य सैनिक निजामी पोलिसांचा हल्ला
होण्यापूर्वी त्यांच्यावर चालून गेले. उन्हाळ्याचे दिवस होते भर उन्हात चकमक चालू
होती. शेवटी निजाम पोलिसांना माघार घ्यावी लागली व तेथून शस्त्रे व दारुगोळा टाकून
पळ काढावा लागला. या चकमकीत सहा पोलीस ठार करण्यात आले. कापरखेडकर व गोविंद विठोबा,
रा. ना. वाकोडे यांना वीरमरण प्राप्त झाले.
वलाना येथील रझाकार केंद्रावर हल्ला
वलाना हे गाव रझाकाराचे केंद्र होते व गोरेगाव पोलीस स्टेशन पासून जवळ
होते. त्यामुळे वलाना रझाकार केंद्राला गोरेगाव पोलीस स्टेशनचा फार मोठा आधार होता. रजाकरांनी वलाना गावाचा
आजूबाजूच्या प्रदेशात धुमाकूळ घातला होता. रझाकार व पोलीस त्यांनी येथे आपली सर्व शक्ती एकवटली होती.
धानोरा त्यांच्या सैनिकांनी बाबुराव भापकर यांच्या नेतृत्वाखाली 22 जून 1948 ला सकाळी 8 ते 9 च्या सुमारास वलानाच्या रजाकार केंद्रावर जबरदस्त
हल्ला केला. या हल्ल्यात आठ रझाकार ठार झाले. या हल्ल्यापुढे रजाकरांचा टिकाव लागला नाही म्हणून ते तेथून
पळून गेले. सैनिकांनी गडीचा ताबा घेतला व गडीवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकला.
त्यानंतर नागोबा दारिवार यांच्या नेतृत्वाखाली तुकडी येथे ठेवली आणि इतर सैनिक
कॅम्पला परत गेले. परंतु त्यानंतर दोन
तासांनी दुपारी 3 ते 4 च्या सुमारास गोरेगाव पोलिसांनी मिलिटरीच्या तुकड्याच्या
साह्याने वलाना गावावर जोरदार हल्ला करुन गडीवर फडकवलेला तिरंगा ध्वज काढून टाकला
व त्या ठिकाणी निजामाचा झेंडा लावला. नागोबा दारिवार आपल्या सरदारसह सर्व धोका
पत्करुन जीवाची बाजी लावली. पोलीस व मिलिटरीचा प्रतिकार करीत राहिला. या मिलिटरीकडे
आधुनिक शस्त्रास्त्रे होती. गावातील लोकांनी हल्ल्याची खबर कॅम्पवर पोहोचवली, कॅम्प मधील विनायकराव चाटणकर यांनी 60 ते 70
सैनिक वालांना येथे नागोबा दारिवार यांच्या मदतीला आणले. दोन्ही
बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. त्यानंतर पोलिसांनी व मिलिटरी सैनिकांनी माघार घेतली व स्वातंत्र्य
सैनिकांनी गोळीबार करुन गडीवर तिरंगा ध्वज चढविला. या निजामाच्या जोखडातून मुक्तही
केले.
आजेगावचा रणसंग्राम
हिंगोली जिल्ह्यातील नरसी, पुसेगाव, आजेगाव येथे रझाकारांचे
केंद्रे होती. रझाकार आणि संस्थान बाहेरुन आणून बसवलेले निर्वासित यांनी या टापूत
भयंकर धुमाकूळ घातला होता. याविषयीच्या बातम्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कॅम्पवर येत होत्या. आजेगाव रझाकार केंद्रावर
हल्ला करण्याची योजना परभणी जिल्हा कार्यालयावर योजण्यात आली. त्यासाठी लोणी, बेड,
धानोरा व शेंबाळ पिंपरी कॅम्पचे विशेष सैनिकी
प्रशिक्षण घेतलेले निवडक असे 100 सैनिक एकत्र करण्यात आले. या हल्ल्याचे
नेतृत्व परभणी जिल्हा उपप्रमुख गंगाप्रसाद अग्रवाल यांनी केले. चारही कॅम्पचे
निवडक सैनिक आपल्या आधुनिक शस्त्रासह बंडला येऊन दाखल झाले. लोणी कॅम्पचे सैनिकाचे
नेतृत्व उपप्रमुख द. रा. मेंढेकर यांनी केले. त्यात अनेक सैनिकांचा समावेश होता.
वेड सैनिकांचे कॅम्प प्रमुख बाबुराव जामकर होते. धानोरा कॅम्प सैनिकांचे नेतृत्व नागोबा दाऱवार यांनी केले. बहिर्जी शिंदे, मास्तर फुलाजी इत्यादीसह अनेक
सैनिक होते. शेंबाळ पिंपरी कॅम्प तुकडीचे नेतृत्व संभाजी पाटील, अण्णासाहेब टाकळगव्हाणकर,
राजाराम निशानकर इत्यादींनी केले होते. 18 जुलै 1948 रोजी गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली चार कॅम्पचे सैनिक
आजेगावाकडे निघाले. 19 जुलै 1948 रोजी आजेगाव येथे
पोहोचले. आजेगाववर हल्ला होणार आहे ही बातमी ज्यावेळेस मिळाली त्यांनी हल्ल्याचा
प्रतिकार करण्याची सर्व तयारी केली.
स्वातंत्र सैनिकांनी आजेगाव येथे
असणारे पोलीस व रजाकार यांच्यावर हल्ला केला पण त्याच वेळी हिंगोलीहून गोळकोंडा
मिलिटरी रेजिमेंटचे सैनिक आजेगाव येथे आले
होते. त्यांनी खंदक खोदून मोर्चा बंदी केली होती . गावाच्या ज्या लोकांनी फितुरी
केली त्यांनी त्या गावाच्या लोकांना झाडाला बांधून ठेवले होते. असे करत असताना रजाकारांना अधिक उत्तेजन मिळावे
असते म्हणून आजेगाववर हल्ला करणे एकमेव पर्याय होता. गंगाप्रसाद अग्रवाल यांनी
अतिशय गुप्त योजनाही केली. आपल्या सैनिकाच्या दोन तुकड्या केल्या. यांनी रजाकारवर हल्ला करावा असा आदेश दिला. एक
तुकडी समोरुन विशीकडे आणि दुसरी तुकडी पिछाडी वरुन हल्ला करणार अशी योजना केली. रा.रा.मेंढेकर
यांनी या तुकडीच्या मागील बाजूने व गंगाप्रसाद आग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली
धानोरा कॅम्पच्या तुकडीने समोरच्या बाजूने हल्ला करावा असा निर्णय झाला.
रजाकरांना सर्व गावातून घेरले होते.
गावातील तटबंदीला प्रत्येक घरात
घराघराच्या मातीच्या भिंतीला छिद्र पाडून मारायच्या जागा ठरवल्या होत्या. वेशीच्या
दोन्ही बुरुजावर पहारा लावला होता. वेशीचे दार बंद करण्यात आले अशा परिस्थितीत
सैनिकांनी तळ्याचा आश्रय घेतला. तळे गावाच्या बाहेर वेशी पासून शंभर ते पाचशे
फुटावर आहे ही लढाई तीन चार तास चालली. दिगाजी आडेकर , फुलाजी आणि मारुती निराळे
शत्रूच्या गोळ्यांनी जखमी झाले होते, या धामधुमीत या जखमी सैनिकांना सुरक्षित
स्थळी हलविणे व त्यांच्या जवळच्या शास्त्राचा इतर सैनिकांना वापर करणे आवश्यक होते.
हे सर्व जखमी शूर सैनिक सुरक्षित हलविण्याची जबाबदारी युवा असलेल्या बहिर्जी यांनी
सांभाळली होती. बहिर्जी हे एक चांगले
नेमबाज होते. शत्रूचा अंदाज घेण्यासाठी डोक्यावरचे हेल्मेट काढून गावाच्या वेशीकडे
उंचावून बघितले आणि त्यावेळी शत्रूची गोळी कानामध्ये लागून आरपार निघून गेली.
बहिर्जी शिंदे खाली कोसळले इतर सैनिकाच्या
मदतीने गंगाप्रसाद अग्रवाल यांनी बाहेरच्या मार्गाने मागे घेतले. त्यावेळी त्यांना संरक्षण नागोबा, नारायण
मास्तर या सैनिकांनी दिले. त्यावेळी गंगाप्रसाद अग्रवाल यांनी सर्व सैनिकांना माघार
घेण्यास सांगितले. सर्व जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी आणले व कॅम्पकडे वाटचाल केली. परंतु दुर्दैवाने
बहिर्जी शिंदे यांचा वाटेतच मृत्यू झाला. वाशीमला त्यांची ही मोठी अंत्ययात्रा
निघाली सैनिकांच्या इंतजामाने त्यांना निरोप देण्यात आला. परंतु गावाच्या मागील
बाजूने द. रा. मेंढेकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सैनिकांनी आजेगाव काबीज केले.
त्यामध्ये 30 ते
40 रजाकार मारले गेले, अनेक जखमी झाले. जखमी रजाकार
जिंतूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अशा प्रकारचे आजेगाव रणसंग्राम
होय. हा सर्व कॅम्पच्या सैनिकांच्या
ध्येयाची व शौर्याची कसोटी पणाला लावणारा एक असा अविस्मरणीय रणसंग्राम होता. या
संग्रामात बहिर्जी शिंदे यांना होतात्म्ये मिळाले.
गोरेगाव पोलीस ठाण्यावर हल्ला
18 ऑगस्ट 1948 ला रात्री सैनिकांनी हिंगोली तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यावर हल्ला
केला. या गोळीबारात चार पोलीस शिपाई जखमी झाले.
जयपुर पोलीस ठाण्यावर हल्ला
जयपूर हिंगोली जिल्ह्यातील
रझाकारांचे बलाढ्य केंद्र होते. या ठिकाणी एक कोडगिरी नाका व पोलीस चौकी होती.
विनायकराव चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली लोणी, ब्याड, धानोरा व शेंबाळपिंपरी
येथील कॅम्पच्या सैनिकांनी संयुक्तपणे 29 ऑगस्ट 1948 रोजी सकाळी 8 वाजता जबरदस्त हल्ला
केला व जयपूर रजाकार केंद्र पोलीस चौकी आणि इतर कोडगिरी नाका उद्ध्वस्त केला. 18 रझाकार ठार झाले व अनेक जखमी
झाले, नाकी सोडून पोलीस व रजाकार पळाले. वसंतराव चौधरी, ध. रा. मेंढेकर. नंदराव
कौसडीकर, दीपाजी पाटील, कुंडलिक, मनोहर कुलकर्णी , पंडितराव देशपांडे, राजेश्वर
वांगीकर, गंगाधर जोशी, रावसाहेब वालूरकर, रामराव काणेकर आदींनी भाग घेतला होता . बयाड
कॅम्पचे प्रमुख बाबुराव जामकर, चंद्रकांत पाटील या सर्व त्यांच्या सैनिकांनी
हैदराबाद सीमेलगतच्या 15 ते 20 किलोमीटरचा
परिसर स्वतंत्र केला होता. ऑगस्ट 1948 अखेरपर्यंत हिंगोली
तालुक्यातील 40 गावांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले होते.
धानोरा कॅम्प
वसमत तालुक्यातील सशस्त्र लढ्याचे केंद्र
सुरुवातीच्या काळापासून सशस्त्र काम गंगाप्रसाद अग्रवाल आणि बापुराव आपटेकर चालवीत
होते. मापटी या गावी पोलीस चौकी असल्याने सुरक्षिततेसाठी गंगाप्रसाद अग्रवाल यांनी
या पांगरा शिंदे येथे माळावर रामचंद्र जोशी यांच्या शेतात केंद्र हलवले. पोलिसांच्या त्रासामुळे नंतर वसमत
तालुक्यातील दगड धानोरा ता. पुसद जि. यवतमाळ येथे नोव्हेंबर 1947 ला कॅम्प घेण्यात
आला. बापुराव आपटेकर यांनी धानोरा कॅम्प प्रमुख नागोबा दारिवार यांची उपप्रमुखपदी
नेमणूक करण्यात आली. नागो वादळ यांना चार आठवड्यात या विशेष प्रशिक्षणासाठी परळी
येथे पाठविण्यात आले. त्याचप्रमाणे नागोबाजी, बहिर्जी वापटीकर, नागोराव मास्तर, बन्सीलाल
शर्मा यासारख्या अनेक सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर व जबलपूर येथे
पाठवण्यात आले, नागोबा अलसटवार यांनी परभणी जिल्ह्यात सर्व कॅम्पवर शस्त्रास्त्रे आणण्याचे
काम यशस्वीरित्या पार पाडले. या कॅम्पच्या सैनिकांनी हिंगोली तालुक्यातील मुलना, वाढवणा, वाघजळी, आजेगाव, जयपूर येथील रजाकार
केंद्रावर हल्ले केले होते. तसेच जिंतूर तालुक्यातील बामणी येथील ठाण्यावरील
हल्यात 4 मे 1948 रोजी विनायकराव चारठाणकर आदीं सैनिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला
होता.
वापटी पोलीस चौकी व रझाकार केंद्रावर हल्ला
हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाच्या
सशस्त्र लढ्यात वसमत तालुक्यातील आजेगाव
अग्रेसर होते. स्वातंत्र्य चळवळीचे वापटी हे ज्वलंत केंद्र होते. या गावात दहशत
बसण्यासाठी निजाम सरकारने या गावी पोलीस चौकी स्थापन केली होती. पोलीस चौकीचे
सशस्त्र लष्कराचा फार मोठा अडथळा होऊ लागला म्हणून या पोलीस चौकीवर हल्ला करुन ती
उद्ध्वस्त करण्याची योजना तयार करण्यात आली. 16 जानेवारी 1948 च्या
रात्री धानोरा कॅम्प प्रमुख बापूराव
आपटेकर यांच्या नेतृत्वाखाली बहिर्जी शिंदे, नागोबा दारिवार, नागोबा आसटवार , नारायणराव
मास्तर यांनी वापटीचे 15 ते 20
सैनिकांनी पोलीस चौकीवर हल्ला केला. या चौकीला एक
पोलीस रायफल घेऊन पाहारा देत होता, त्यास चाहुल लागताच त्या पोलिसांनी
सैनिकावर रायफल रोखून नेम धरला, इतक्यात नागोबा यांनी 303 बंदुक घेऊन पुढे सरसावले
गेले. यात त्यांनी पोलिसांवर गोळी झाडली. तो खाली कोसळला त्यांच्याकडे असलेली रायफल बहिर्जी शिंदे यांनी हस्तगत केली.
बाकीचे पोलीस पळून गेले. या हल्ल्यानंतर निझाम सरकारला पोलिसांची
चौकी तेथून हलवावी लागली.
शिरड शहापूर पोलीस स्टेशनवर हल्ला
30 जून 1948 च्या रात्री गंगाप्रसादजी
अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली
धानोरा कॅम्पच्या 30 ते 40 सैनिकांनी शिरड शहापूरच्या पोलीस
स्टेशनवर आणि फौजदारावर हल्ला केला. यापूर्वी कुरुंदा पोलीस स्टेशन व तेथील फौजदारावर हल्ला करण्याचे ठरले होते. ऐनवेळी
माळ या गावाच्या काही लोकांनी सैनिकाना साथ देण्यास नकार दिल्यामुळे सैनिकानी शिरड
शहापूरकडे आपला मोर्चा वळवला. सैनिकांनी रात्री पोलीस स्टेशनवर हल्ला केला , यामध्ये 3 पोलीस ठार झाले व इतर पोलीस तेथून पळ काढण्यात
यशस्वी झाले होते. यावेळी येथील हल्ल्यामध्ये
गंगाप्रसाद अग्रवाल यांच्याबरोबर बापुराव वापटीकर, नागोबा दरेवार , आलसटवार,
बहिर्जी वापटीकर, नारायण मास्तर इत्यादी सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन
सहभाग दिला होता. या हल्ल्यामुळे निझामी
पोलिसात चांगलीच दहशत स्वातंत्र्य सैनिकांची पसरवली होती.
शेंबाळ पिंपरी कॅम्प
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्याच्या शेजारी शेंबाळपिंपरी ता. पुसद जि. यवतमाळ येथे 10 नोव्हेंबर 1947 रोजी शेंबाळपिंपरी कॅम्पची
स्थापन करण्यात आला होती. हैदराबाद
स्टेट काँग्रेसचे कळमनुरी तालुकाप्रमुख व संघटक दिपाजी पाटील यांची शेंबाळपिंपरी कॅम्पच्या
प्रमुखपदी नेमणूक केली गेली होती. याबरोबरच उपप्रमुख म्हणून पुरभाजी पाटील यांची
पण नेमणूक करण्यात आली. या कॅम्पवरील काही सैनिकांनी गनिमी पद्धतीने हल्ले करणे, रायफल
व स्वयंचलित शस्त्रे चालविणे, शस्त्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे,
जिल्हेटीन लावणे, त्याचा वापर करणे
इत्यादीचे विशेष प्रशिक्षण देण्याचे कार्य
हा कॅम्प करत होता. तसेच यामध्ये गुप्त
कारवाईमध्ये कसा भाग घ्यावा हे प्रशिक्षण या कॅम्पमधील सैनिकांना दिले जात होते.
यामध्ये अण्णासाहेब टाकळगव्हाणकर, नारायणरावजी, खंडेराव सूर्यवंशी, गोविंदराव
चन्नेवार यांनी विशेष प्रशिक्षण नागपूर येथून पूर्ण केलेले होते. विशेष प्रशिक्षण
घेतलेल्या सैनिकांना कळमनुरी तालुक्यातील करोडगिरी नाके व रझाकार केंद्र यांच्यावर
हल्ले करुन ती उद्ध्वस्त करण्यासाठी नियुक्त केले जात होते. तसेच येथील निवडक
सैनिकांनी परभणी जिल्ह्यातील लोणी, ब्याड, धानोरा कॅम्प सैनिकासोबत संयुक्तपणे
बामणी पोलीस स्टेशन, वालांना, आजेगाव, जयपूर येथील रजाकार केंद्रावर हल्ले
केल्याचे अनेक दाखले प्राप्त होतात. शेंबाळपिंपरी कॅम्पच्या सैनिकांनी रझाकार
केंद्र पोलीसांवर हल्ले करुन मोठ्या प्रमाणात यश संपादन केले होते.
गाडीबोरी करोडगिरी नाक्यावर हल्ला
कळमनुरी तालुक्यातील पैनगंगा
नदीच्या काठावर गाडीबोरी येथे करोडगिरी
नाका होता. गाडीबोरी येथील पोलीस चौकी
मजबूत होती. या नाक्याचा प्रमुख अत्यंत मगरुर
व व्यसनी असून त्याने येथील परिसरातील जनतेवर अन्याय-अत्याचार चालविले
होते. त्यावेळी शेंबाळपिंपरी कॅम्पच्या सैनिकांनी
या नक्यावर हल्ला करुन तेथील निझामी नाका प्रमुखास धडा शिकविण्याचा निर्णय घेतला.
करोडगिरी नाक्यावरील हल्ल्याचे नेतृत्व करण्यासाठी विठ्ठलराव नाईक चिंचोलीकर या
तरुण तडफदार सैनिकांची नेमणूक करण्यात आली होती. रामवाणी यांच्या टेहळणी पथकातील
गुप्तहेरांची नाक्याची इत्यंभूत माहिती आणली होती. विठ्ठलराव नाईक हे कामाठ्याच्या
वेशात वेषांतर करुन कामाठ्याच्या वेषांत
नाक्यावर गेले. नाकेदार व त्यांचे साथीदार दारु पिऊन मदमस्त झालेले होते. ते दिपाजी पाटील यांच्या आदेशाप्रमाणे 26
नोव्हेंबर 1947
रोजी विठ्ठलराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली 30 सशस्त्र
सैनिकांनी पैनगंगा ओलांडली व अकस्मात करोडगिरी नाक्यावर हल्ला केला. सैनिकांनी
नाक्याला वेढा दिला, नाका पूर्णपणे जाळून टाकण्यात आला, या हल्ल्यात नाकेदार व
त्याचे साथीदार मारले गेले. या हल्यात सैनिकांनी बंदूका, तलवारी व भाले यांचा वापर
केला होता. दिपाजी पाटील, विठ्ठलराव नाईक, राजाभाऊ वाकडे, मार्तंडराव नाईक,
बाबुराव आडेकर, गुणाजीराव, रामभाऊ आणि गोविंदराव दत्तोपंत साळेगावकर. लिंबाजी
अंबादास पांडे, शंकराव कुलकर्णी, शामराव पानबुडे यासारख्या असंख्य सैनिका बरोबरच गणपतराव जामगावकर इत्यादी
सैनिकांनी भाग घेतला होता. निजामी पोलिसांनी दिपाजी पाटील, विठ्ठलराव नाईक
यांच्यावर खुनाचा आरोप ठेऊन त्यांच्या
नावाचे अटक वारंट काढले हाते. परंतू निझाम
पोलिसांना त्यांना पकडणे शक्य झाले नाही.
गोळमांजरीची लढाई
गोळमांजरी गाव शेंबाळपिंपरी कॅम्पपासून
3 ते 4 मैल अंतरावर आणि पैनगंगेच्या काठावर आहे. शेंबाळपिंपरी कॅम्प दिपाजी पाटील,
नागोराव धांडेकर, रावसाहेब वडगावकर, मारोतराव नाईक यांच्या नावाने निजामी पोलिसांचे वारन्ट काढले होते. दिपाजी
पाटील व रावसाहेब वडगावकर यांना तर जिवंत पकडण्यासाठी 10 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. हे बक्षीस
मिळविण्यासाठी रजाकारांनी एक गुप्त डाव रचला होता. यातील एका रजाकाराने वेषांतर करुन गोळमांजरी
येथे आला होता. रझाकारांनी येथील स्त्रियांवर अत्याचार केला आहे, ही बातमी दिपाजी
पाटील यांना कळताच त्यांच्या नेतृत्वाखाली
50 ते 60 स्वातंत्र्य सैनिकांनी पैनगंगेच्या तीरावर गेले. दिपाजी पाटील व
त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीकाठच्या भागाची पाहणी केली, तेव्हा त्यांना नदीकाठावर
दबा धरुन बसलेला रजाकार दिसला. त्यांनी वेशांतर करुन आलेल्या रजाकरांना बेदम मारहाण
करुन त्यांचे खरे रुप काय ते लोकाच्या
समोर उघड केले. पैनगंगा नदी पलीकडच्या दरडी
आड लपलेल्या इतर रजाकरांच्या हे लक्षात येऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य
सैनिक त्यांच्याकडे येत असल्याचे लक्षात
येताच त्यांनी गोळीबार केला. यामध्ये दिपाजी
पाटील थोडक्यात बचावले, दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. यामध्ये 3 रजाकार ठार
झाले आणि कित्येक जण जखमी झाले होते.
शिरुर करोडगिरी नाक्यावर हल्ला
शेंबाळपिंपरी कॅम्प सैनिकांनी 20 एप्रिल 1948 ला गनिमी कावा पद्धतीने शिरुरच्या करोडगीरी नाक्यावर हल्ला करुन
तेथील करोडगिरी नाका नष्ट केला व तेथील रेकॉर्ड पूर्णपणे जाळून टाकले.
गांजापूरची लढाई
निजाम सरकारच्या पोलिसांनी मिलिटरी सैनिकाच्या व रझाकाराच्या मदतीने 26 एप्रिल 1948 ला गांजापूर या गावावर हल्ला
केला. ही बातमी शेंबाळपिंपरी येथील कॅम्पच्या
गस्ती पथकाला कळताच पथकातील सैनिक
जनतेच्या मदतीला गेले. या वेळी कॅम्प
सैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी पोलीस व रजाकरांना घेरण्याचा निर्णय घेतला. त्यात
रझाकारांनी प्रतिकार केला, या हल्ल्यात निजामाचा 1 सैनिक ठार झाला आणि 5 जण जखमी झाले होते व इतर
पळून गेले.
मरडगा निवळी रस्त्यावरील रझाकारांचा बंदोबस्त
मरडगा ते निवळी रस्त्यावर वाटमारी
करुन लोकांना व संस्थांना निर्वासित लुटत असत. पुरभाजी पाटील यांच्या सशस्त्र
पथकाने लूटमार करणाऱ्या रझाकार यांच्यावर
हल्ला केला त्यामध्ये दोन रझाकर ठार झाले.
-- प्रा.डॉ.राजाराम पिंपळपल्ले,
इतिहास विभागप्रमुख आदर्श
महाविद्यालय
हिंगोली मो. 9970414332
लेखनासाठी साह्यभूत ग्रंथ / इतर वाचनीय साहित्य
1)
अनंत भालेराव -हैदराबादचा
स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा.
2)
स्वातंत्र्य दिन सुवर्ण महोत्सव विशेषांक- दैनिक लोकमत, 15 ऑगस्ट 1997.
3)
डॉ. अनिल कटारे -मराठवाड्याचा इतिहास, कल्पना प्रकाशन नांदेड, प्रथम आवृत्ती -नोव्हेंबर 1999.
4)
डॉ. पी व्ही काटे- मराठवाड्याचा इतिहास -कैलास पब्लिकेशन
औरंगाबाद ,प्रथम आवृत्ती- जून
1999.
5)
नरहर कुरुंदकर- हैदराबाद विमोचन आणि
विसर्जन.
6)
अशोक परळीकर- हैदराबादचा पहिला
सत्याग्रह.
7)
मायबोली मराठवाडा- संपादक श्रीराम पाटील, जानेवारी 2005.
8)
हैदराबाद मुक्ती संग्रामातील पूर्ण वेळ कार्यकर्ते -चरित्र व कार्य भाग 1प्रथम आवृत्ती, 3 आक्टोंबर 2012.
9)
साप्ताहिक कल्पनाशक्ती- संपादक उमाटे -16 सप्टेंबर 2011 वर्ष पहिले
अंक 18 ,नांदेड.
10) डॉ.अंभोरे ए.जी.- हैदराबाद
स्वातंत्र्यसंग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान (पीएचडी संशोधन प्रबंध) इतिहास
विभाग
प्रमुख
तोष्णीवाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सेनगाव
**********
No comments:
Post a Comment