01 September, 2022

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नेहरु युवा केंद्रामार्फत धावणे स्पर्धा

प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव

 


हिंगोली (जिमाका), दि. 01 : येथील नेहरु युवा केंद्र व भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाद्वारा आयोजित हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने व तसेच राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या अनुषंगाने दि. 29 ऑगस्ट, 2022 रोजी आदर्श कॉलेज मैदान येथे मुलांसाठी 1600 मीटर आणि मुलींसाठी 400 मीटर भव्य धावणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

ही स्पर्धा नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रवि हनवते, सुधाकर पाईकराव, संदीप कांबळे यांनी युवकांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. तसेच नेहरु युवा केंद्राचे हिंगोली तालुका समन्वयक प्रविण पांडे यांनी नेहरु युवा केंद्रामार्फत भारत सरकारच्या राबविल्या जाणा विविध खेळ स्पर्धाविषयी माहिती दिली व खेळाचे माणसाच्या आयुष्यातील महत्व समजावून सांगितले. तसेच ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत 1600 मीटर मुलांमध्ये अनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय येणाऱ्या शिवाजी शिंदे, रामेश्वर जगताप, शेख मोसिम यांना आणि 400 मीटर धावणे स्पर्धेमध्ये मुलींमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या अनुराधा साखरे, सुनिता जाधव, तन्वी घुगे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन नेहरु युवा केंद्राचे तालुका युवा समन्वयक प्रवीण पांडे, संदीप शिंदे, बाळू नागरे, सिंधू केंद्रे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील युवा, युवती, नागरिक आदींची उपस्थिती होती.   

****

No comments: