‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
करावी
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 21 : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’अभियानाबाबत
जिल्हा दक्षता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र
सूर्यवंशी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ.कैलास शेळके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.लांजेवार यांची उपस्थिती
होती.
यावेळी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी जिल्ह्यातील 18 वर्ष वयोगटावरील सर्व महिला, माता,
गरोदर स्त्री यांची सर्वांगीण तपासणीसाठी दि. 26 सप्टेंबर, 2022 रोजी पासून
नवरात्री उत्सवात "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हे अभियान राबविण्यात
येणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट राज्यातील 18 वर्ष वयोगटावरील सर्व महिला, माता,
गरोदर स्त्री यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक, व उपचारात्मक आरोग्य सुविधा
उपलब्ध करुन देणे. सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे
हे आहे. या मोहिमेचा शुभारंभ दि. 26 सप्टेंबर, 2022 रोजी नवरात्री उत्सवात पासून होणार
आहे. या मोहिमेची जिल्ह्यातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका,
अंगणवाडी इत्यादी मार्फत घरोघरी माहिती देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी
या शिबिरात आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, अशी माहिती दिली.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय
अधीक्षक, आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment