३४ महिला प्रशिक्षणार्थींनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ; बालविवाह दिसल्यास १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली, दि. २१ नोव्हेंबर (जिमाका) : बालहक्क सप्ताह तसेच २७ नोव्हेंबर रोजी बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यासाठी आरसेटी, हिंगोली येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बालविवाह व सक्तीचे विवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण यंत्रणा आणि महिला प्रशिक्षणार्थींनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात बालविवाहाची माहिती मिळताच तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, बालकांच्या संरक्षणासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ब्युटी पार्लर व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील ३४ महिला प्रशिक्षणार्थींना बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाहास प्रतिबंध असल्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बालविवाहामुळे शिक्षण, आरोग्य आणि बालकांच्या भविष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली.
या कार्यक्रमास आरसेटीचे संचालक हेमराज बनसोड, जिल्हा प्रशिक्षिका संगीता मुळे, करण कुरे, कार्यालयीन सहाय्यक संदीप खंडारे, शिवाली फंदे, रितेश राठनालू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद मुडे आणि अंकुर पाटोडे उपस्थित होते. बालविवाह दिसून आल्यास किंवा त्याची माहिती मिळाल्यास १०९८ या बाल मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिला प्रशिक्षणार्थींनी “बालविवाह थांबवा, बालपण वाचवा” अशी शपथ घेतली.
No comments:
Post a Comment