विशेष संक्षिप्त
पुनरिक्षण कार्यक्रम-2022 अंतर्गत
हिंगोली जिल्ह्याची
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
- जिल्ह्यात 14 हजार 878 नव मतदारांची वाढ
हिंगोली, (जिमाका) दि. 11 : भारत
निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार दिनांक 01 जानेवारी
2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
घोषित करण्यात आलेला होता. या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2021
ते 05 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात आले. सदर दावे व हरकतीवर निर्णय
घेण्यात येऊन अंतिम मतदार यादी दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी
कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय सर्व मतदान केंद्र
व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयाचे https://ceo.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर येथे प्रसिध्द
करण्यात आली आहे.
या कार्यक्रमानुसार हिंगोली जिल्ह्यात 03 विधानसभा मतदारसंघांतर्गत दिनांक 01 जानेवारी
2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. आगामी स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सदर नव मतदार यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचा
हक्क मिळणार आहे. तसेच जुन्या मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मतदारांच्या विनंती
अर्जानुसार नावामध्ये दुरुस्ती करणे, विधानसभा मतदारसंघांतर्गत नाव स्थलांतर करणे ई.कामेही
करण्यात आली आहेत.
हिंगोली जिल्ह्यात एकूण 14 हजार 878 नव मतदारांची वाढ झालेली
आहे. आता जिल्ह्यात एकूण 9 लाख 42 हजार 510 मतदार झाले आहेत. यामध्ये 4 लाख 93 हजार
868 पुरुष मतदार, 4 लाख 48 हजार 640 महिला मतदार तर 2 तृतीय पंथी मतदारांचा समावेश
आहे. या सर्व मतदारांची मतदार यादीतील छायाचित्रे शंभर टक्के अद्यावत करण्यात आली आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील विधानसभानिहाय
पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदारांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
92- वसमत विधानसभा मतदारसंघात एकूण
3 लाख 8 हजार 806 मतदार असून यामध्ये पुरुष-1 लाख 60 हजार 666, महिला-1 लाख 48 हजार
138, तृतीयपंथी-2 मतदारांचा समावेश आहे. 93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख
13 हजार 665 मतदार असून यामध्ये पुरुष-1 लाख 64 हजार 845, महिला-1 लाख 48 हजार 820
मतदारांचा समावेश आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 20 हजार 39 मतदार
असून यामध्ये पुरुष- 1 लाख 68 हजार 357, महिला- 1 लाख 51 हजार 682 मतदारांचा समावेश
आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी जितेंद्र पापळकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली
हिंगोली जिल्ह्यात 03 विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी
व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर नवीन मतदार
नोंदणी करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment