मिशन वात्सल्य अंतर्गत मिळणाऱ्या
लाभापासून
एकही महिला व बालक वंचित राहणार
नाही याची दक्षता घ्यावी
-
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
हिंगोली दि.20 (जिमाका) : कोविडमुळे प्रभावित
झालेल्या महिला व बालकांना शासन स्तरावरुन मिशन वात्सल्य अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा
लाभापासून एकही महिला व बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्हास्तरीय कृतीदल व मिशन वात्सल्य
अंतर्गत योजनांच्या आढाव्यासाठी जिल्हा कृतीदलाचे (Task Force) अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झुम ॲपद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात
आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, ज्यांची नावे यादीतून सुटलेली आहेत, त्यांची गृह चौकशी
करुन योजनांचा लाभ द्यावा. जिल्ह्यात काळजी व संरक्षणाची गरज असलेली 167 बालके आढळून
आली आहेत. या बालकांविषयी कुठल्याही प्रकारच्या
समस्यांची माहिती जिल्ह्यात कार्यरत संबंधित यंत्रणांना त्वरित देऊन सहकार्य करावे.
कोविडमुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे 18 वर्षाखालील बालकांचे आई-वडील मृत्यू पावले
असल्यास अनाथ प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली
यांच्याकडे अर्ज सादर करावेत. 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी राष्ट्रीय
बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत करण्यात यावी. तसेच या सर्व बालकांना शासनाच्या विविध
योजनांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना दिल्या.
मिशन
वात्सल्य योजने अंतर्गत सर्व तहसीलदारांनी कोविड-19 मुळे विधवा झालेल्या महिला व एकल
महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराभिमूख प्रशिक्षण
देण्यात यावे व इतर विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना संबंधित कुटुंबापर्यंत पोहचवाव्यात.
जेणे करुन सदर महिला व कुटुंबांना याचा लाभ होईल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर
यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात
18 वर्षा खालील एक पालक गमावलेल्या 164 व दोन्ही पालक गमावलेले 3 बालके असून त्या बालकांना
बाल संगोपन योजनेअंतर्गत 1100 रुपये प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच दोन्ही
पालक गमावलेल्या 03 बालकांचे नावे 5 लाख रुपयाची मुदत ठेव तयार करण्यात आली आहे आणि
पी.एम.केअर फॉर चिल्ड्रन्स स्किम फंडातून 10
लाख रुपये मिळण्यासाठी महिला व बालविकास कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 18 बालकांची शैक्षणिक फी बाबतची
माहिती आयुक्तालय महिला व बाल विकास म.रा. पुणे यांना पाठविण्यात आली आहे. कोविड काळात
विधवा झालेल्या महिलांना मिशन वात्सल्य अंतर्गत लाभ मिळण्यासाठी सर्व तहसीलदारांना
माहिती पाठविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी यावेळी दिली.
या बैठकीस
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे, सर्व तहसीलदार, सर्व बाल विकास
प्रकल्प अधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी,
मुख्य कार्यकारी , नगर परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त कौशल्य विकास, सहायक
आयुक्त समाज कल्याण यांचे प्रतिनिधी, जिल्हा
कार्यक्रम अधिकारी (जि.प.), जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, सदस्या बाल
कल्याण समिती, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा संरक्षण अधिकारी, महिला
व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कायदा व परिविक्षा अधिकारी आदी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment