कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण पूर्ण
करणे आवश्यक
- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड
* कोविड-19 च्या धर्तीवर “ माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या उपक्रमात शाळा बंद पण शिक्षण सुरु
* आमचा गाव, आमचा विकास या योजनेचे आराखडे पूर्ण करणारी हिंगोली जिल्हा परिषद देशात पहिली
* परसबागा तयार करण्यात हिंगोली जिल्हा राज्यात
दुसरा
हिंगोली, दि.26 (जिमाका) : सध्या कोरोनावर लस हा एकमेव उपाय
आहे. भारतात आतापर्यंत अनेक नागरिकांना कोरोना लसीकरणाचे डोस देण्यात आलेले आहेत. लस
पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी अद्यापही कोविडची लस घेतली नाही, त्यांनी कोणत्याही
अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी व ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनी देखील दुसरा
डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करावे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण पूर्ण करणे आवश्यक
आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री
प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक
दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री प्रा.वर्षा
गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी त्या
बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, आमदार
तान्हाजी मुटकूळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार संतोष टारफे, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग
बोरगावकर, राज्य राखीव दलाचे समादेशक संदिपसिंह गिल, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा
परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, जिल्ह्यात
आतापर्यंत 8 लाख 6 हजार 133 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 5 लाख 1 हजार
971 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तसेच आता 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींनाही
लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 33 हजार 966 मुला-मुलींनी लसीचा
डोस घेत चांगला प्रतिसाद दिला आहे. कोविड-19
सोबत आपण समर्थपणे मुकाबला करत आहोत. यासाठी शहरी व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन
प्लाँटची उभारणी करण्याबरोबरच ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देत जिल्हा सामान्य
रुग्णालय, कोविड केअर सेंटरमधील 18 केंद्रावर 121 आयसीयू, 847 ऑक्सिजन व 2856 सर्वसाधारण
असे एकूण 3944 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महिला व लहान मुलांसाठी
100 खाटांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच लेवल तीनचे इंटेन्सिव पेडीयाट्रीक
केअर युनिट व 20 खाटांचे एन.आय.सी.यू., 25 स्वतंत्र व्हेंटीलेटर, आणि 124 खाटांचे एस.एन.सी.यु.
उपलब्ध करण्यात आले आहेत.
यासोबतच कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन
निर्मिती, औषधांची उपलब्धता, लसीकरण, कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळा, ऑक्सिजन बेड्स आदींच्या
माध्यमातून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात आली आहे. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या
वसमत येथील स्त्री रुग्णालय व इतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेडची
क्षमता वाढ करण्यात येत असून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम
आहे, असे सांगितले.
जिल्ह्यात अतिवृष्टी
व पुरामुळे बाधित झालेल्या 2 लाख 97 हजार 867 शेतकऱ्यांना 75 टक्के निधी मदत म्हणून
222 कोटी 94 लाख निधी मिळाला आहे. यापैकी 208 कोटी 58 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या
खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच 56 लाख 14 हजार रुपयाच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
कोविड-19 च्या धर्तीवर
राज्यात बंद असलेल्या शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने स्थानिक पातळीवर परिस्थितीचा
आढावा घेवून, शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. यापुर्वीही आपण “ माझे विद्यार्थी
माझी जबाबदारी” या उपक्रमात शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवले आहे.
आमचा गाव, आमचा विकास या योजनेतून
आता गावाच्या विकासाचा प्राधान्यक्रम ठरणार आहे. यासाठीचे आराखडे जिल्ह्यातील सर्व
563 ग्रामपंचायतीने अपलोड करण्याचे काम पूर्ण केले आहे. हे काम पूर्ण करणारी हिंगोली
जिल्हा परिषद राज्यातच नव्हे तर देशात पहिली ठरली असल्याचेही यावेळी पालकमंत्री प्रा.
गायकवाड यांनी सांगितले.
जिल्ह्यात 663 गावात जलजीवन मिशनची
मोहिम राबविली जात आहे. यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे 12 गावातील योजनेची
कामे असणार आहेत. उर्वरित 651 गावातील नळ योजनेची कामे जिल्हा परिषद व तांत्रिक सल्लागार
समिती करणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत निवडलेल्या गावापैकी 576 गावात प्रत्यक्षात जलजीवन
मिशनची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी 207 ठिकाणी पुनर जोडणीची कामे व 357 ठिकाणी
नवीन नळ योजनेची कामे सुरु केली जाणार आहेत. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत रोजगार निर्मिती
उपलब्ध करुन देण्यासाठी व या योजनेला अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील हिंगोली, औंढा
आणि सेनगाव या तीन तालुक्यासाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे एकूण तीन कोटी रुपयांचा
निधी मंजूर करण्यात आला आहे.
वसमत येथील राष्ट्रीय महामार्गावर
असलेल्या कनेरगाव शिवारात 65 एकरांवर प्रस्तावित असलेले मॉडर्न मार्केट उभारण्यात येणार
आहे. त्यामुळे देशात जयपूर, बंगळूरुनंतर वसमतला मॉडर्न मार्केट होणार असून जागतिक दर्जाची
बाजारपेठ उभी राहणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात हिंगोली नगर पालिकेने मागील सहा
वर्षापासूनचे सातत्य कायम राखत यंदा राज्यातील पहिल्या दहा नगरपालिकांमध्ये स्थान मिळविल्यामुळे
20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात पालिकेचा गौरव करण्यात आला आहे. ही अभिमानाची बाब
असल्याचे पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यात आलेल्या लहान मुलांच्या
मनातील पोलिसांविषयी भिती दूर व्हावी, त्यांना खुल्या वातावरणाचा, खेळाचा आनंद घेता
यावा आणि यातून काही गुन्हेही रोखण्यास मदत व्हावी यासाठी हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये
चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन सुरु करण्यात आले आहे.
राज्य शासनाने आर.आर. पाटील सुंदर
गाव स्पर्धेत जिल्ह्यातील 05 ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्कार प्राप्त पाचही गावांना प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे 50 लाखाची रक्कम मिळाली
आहे. या तरतुदींमधून संबंधित गावांना नाविण्यपूर्ण विकास कामासाठी खर्च करता येणार
आहे.
जिल्ह्यात विविध घरकूल योजनेतून
एक हजार पेक्षा जास्त पूर्णत्वास आलेल्या घरकुलांचा गृह प्रवेश कार्यक्रम आयोजन करुन
घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना
व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीणमध्ये 19 हजार 860 घरकुलाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी
15 हजार 930 घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. याची टक्केवारी 80 टक्के इतकी आहे. तसेच
येत्या मार्च अखेरपर्यंत उर्वरित 3930 घरकुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही
पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती
अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 5020 बचतगटांना 750.75 लक्ष रुपयाचा फिरता निधी
वितरीत करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे सन 2021-22 मध्ये एकूण 5 हजार 136 परसबागा तयार
करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा राष्ट्रीय कृषि योजना, राष्ट्रीय कृषि विकास
योजना अनुसूचित जाती व जमाती या योजनेत सन 2020-21 व 2021-22 साठी 914 विहिरींच्या कामांना मंजुरी
मिळाली असून आतापर्यंत 125 विहिरींचे काम पूर्ण झालेली आहेत. तर 450 विहिरींची कामे
प्रगतीपथावर आहेत. वन विभागामार्फत सन 2021 च्या पावसाळ्यात जपान देशाच्या प्रसिध्द
वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. आकिरा मियावाकी यांच्या मॉडेलनुसार जिल्ह्यात 10.53 हेक्टर
क्षेत्रावर 20 घनवन रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3 लाख 42 हजार 900
वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. या घनवन लागवडीमुळे झाडांची दोन ते तीन वर्षात वाढ
होते. त्यामुळे तापमान वाढीमुळे जमिनीची होणारी धूप कमी होण्यासाठी मदत होते. तसेच
मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची वाढ होण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या
महासंकटाचा मुकाबला करत आपण जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून
काम करत राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून
आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे सांगून पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सामाजिक
न्याय व विशेष सहाय विभागाने प्रकाशित केलेल्या हिंगोली जिल्हा व्हिजन या
पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमार्फत
शहीद सैनिकांच्या वीर माता रुक्मिणीबाई परसराम भालेराव, रा. पिंपळदरी, औंढा ना.
यांना जमीन वाटपाचा सातबारा पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच यावेळी
आरोग्य विभागाच्या वतीने तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.
यावेळी पदाधिकारी, विविध विभागातील
अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने
उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment