06 January, 2022

 

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी

उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 :  कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार जगभर अत्यंत वेगाने होत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण गत आठवड्यात वाढल्याचे दिसून येत आहे.

त्या अनुषंगाने मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई आणि विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी दि. 3 जानेवारी, 2022 रोजी घेतलेल्या व्हीसी बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी या आदेशान्वये हिंगोली जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपयोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणुका करुन त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 10 जानेवारी, 2022 पासून जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी यांना सुट्टीवर जाण्यास परवानगी नसणार आहे. याची जबाबदारी हिंगोली जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखावर सोपविली आहे.

मागच्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट अधिक तीव्र असल्याने रॅपिड अँटीजेन कीट, आरटीपीसीआर कीटची उपलब्धता अधिक प्रमाणात करुन घेण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्यक अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपविली आहे.

हिंगोली जिल्ह्याचे पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 10 टक्के पेक्षा कमी राहील यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न करण्याची जबाबदारी सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपवली आहे.

कोरोना चाचणी अहवा 24 तासाच्या आत सादर करण्याची जबाबदारी , अहवाल प्राप्त झाल्यास तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसींग नोडल अधिकारी यांना सादर करण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. लखमावार यांच्यावर सोपवली आहे.

जिल्हास्तरीय कॉन्टॅक्ट ट्रेसींगबाबत सनियंत्रण करणे, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसींगच्या अनुषंगाने आरोग्य विभाग, महसूल, पोलीस विभाग, नगर पालिका, तसेच इतर संबंधित अधिकारी यांच्या बैठकाचे आयोजना करणे, ऑनलाईन पोर्टलवर कॉन्टॅक्ट ट्रेसींगबाबत माहिती अपलोड करण्याच्या अनुषंगाने नियोजन करणे, इतर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेला पॉझिटिव्ह रुग्णांचा कॉन्टॅक्ट ट्रेसींग चा अहवाल सादर करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसींगचे काम करताना नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहाय्याने काम करावे, कोरोनाच्या आयसीएमआर, आयडीएसपी, सीसीएमएस इत्यादी सर्व पोर्टलची माहिती अद्यावत अपलोड करणे, कोरोनाबाबत सर्व ऑनलाईन माहिती, गुगल शीट इत्यादी अद्यावत करण्याची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी, हिंगोली (नोडल अधिकारी), डॉ. गोपाळ कदम (सहा. नोडल अधिकारी, डॉ. देवेंद्र जायभाये (सहा. नोडल अधिकारी) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसींग करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसींग कामात सहाय्य करण्यासाठी शिक्षक, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी, कृषी सेवक, नगर पालिका कर्मचारी यांचे संबंधित विभागाच्या मदतीने नियुक्ती आदेश काढण्याची जबाबदारी सर्व उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठाबाबत सनियंत्रण करणे, ऑक्सिजन पुरवठ्याच्या अनुषंगाने आरोग्य विभाग, महसूल, पोलीस विभाग, नगर पालिका, तसेच इतर संबंधित अधिकारी यांच्या बैठका आयोजित करणे याबाबत काम करताना नोडल अधिकारी व सहा. नोडल अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहायाने काम करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर (नोडल अधिकारी), डॉ. नगरे (सहा. नोडल अधिकारी) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

लिक्विड ऑक्सिजन वितरण व्यवस्थेबाबत नियोजन करणे, जम्बो सिलिंडर हाताळण्यासाठी ऑक्सिजन ट्रॉलीचा वापर करण्याची जबाबदारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर सोपवली आहे.

ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नियोजन करणे, अशा वाहनांना वाहतूक सुरळीत करुन देणे इत्यादी उपाययोजना करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांच्यावर सोपवली आहे.

ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनात पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, हिंगोली, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

ऑक्सिजन बाबतची प्रलंबित देयके तात्काळ वितरीत करणे, जिल्ह्यातील 6 पीएसए प्लॉट हे शुक्रवार दि. 7 जानेवारी, 2022 पर्यंत कार्यान्वित करुन घेण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

डीसीएच, डीसीएचसी व सीसीसी मधील भोजन व्यवस्थेची वेळोवेळी तपासणी करणे, सर्व कोरोना रुग्णालये, सीसीसी तात्काळ सर्व सोयीनी युक्त कार्यान्वित करुन घेण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

डीसीएच, डीसीएचसी व सीसीसी, सर्व शासकीय रुग्णालयातील विद्युत व्यवस्था, देखभाल व दुरुस्ती, वायरिंग तपासणी तात्काळ करुन घेण्याची जबाबदारी सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

खाजगी रुग्णालयातील किमान 3 हजार बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करुन घेण्यासाठी तात्काळ नियोजन करुन जिल्हाधिकारी यांना नियोजन सादर करणे. जानेवारी मध्यापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पिक पिरियडला सुरुवात होणार असून तिसऱ्या लाटेत मागच्या लाटेच्या तुलनेत दीड पट रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मागच्या बेड उपलब्धतेपेक्षा 40 टक्के अधिक बेड व्यवस्था करण्याचे नियोजन करणे, जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात, शासकीय रुग्णालयात रॅपिड अँटीजेन टेस्ट, आरटीपीसीआर तपासणी काऊंटर सुरु करण्यात यावे (ज्या कार्यालयात जास्त गर्दी होते असे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बँका, तहसील, पंचायत समिती, उप निबंधक कार्यालय इत्यादी). जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर, आरोग्य सेविका यांना पल्स ऑक्सिमीटर व थर्मल गन यांच्या माध्यमातून तपासणीची मोहीम आखण्यात यावी. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, औषधी उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व एक नर्स नियुक्त करणे बंधनकारक असेल, याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

कोरोना रुग्णालयातील स्वच्छता, साफसफाई, बायो मेडिकल वेस्ट इत्यादीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे व त्यांचे प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं. यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, एडीएचओ, एसीएस, निवासी वैद्यकीय अधिकारी, सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी स्वत: कोरोना रुग्णालयात जावून कोरोना रुग्णांची तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, एडीएचओ, एसीएस, आरएमओ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

औषध वितरण व्यवस्थेबाबत नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

लसीकरणाचा दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांचे तात्काळ दि. 15 जानेवारी, 2022  पर्यंत लसीकरण करुन घेण्याची जबाबदारी सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग जि. प. , सर्व तहसील सर्व नगर पालिका, पंचायत येथे कॉल सेंटरची स्थापना करण्यात यावी. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या अडचणी, होम आयसोलेशन मॉनिटरींग, बेड उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता, औषधी उपलब्धता , शहराचे, वस्तीचे सॅनिटायझेशन इत्यादीबाबत नियोजन करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी क्रमांक तात्काळ कार्यान्वित करुन प्रेसनोटद्वारे प्रसिध्दी देण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

इसीआरपी-2 मधील सर्व मंजूर आराखडानुसार खरेदी दि. 31 मार्च, 2022 च्या आत करुन घेण्यासाठी निविदा प्रक्रिया व वर्क ऑर्डरबाबत एक आठवड्याच्या आत कार्यवाही करणे, रुग्णवाहिका इंधन खर्च, चालक खर्च इसीआरपी-2 या निधीतून करुन घेता येईल काय याबाबत तपासणी करणे, जुलै, 21 ते मार्च, 22 या कालावधीतील मनुष्यबळासाठी लागणारा खर्च इसीआरपी-2 मधून करता येईल काय याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

कोरोना रुग्ण मयत झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य ती व्यवस्था असल्याची खात्री करण्याची जबाबदारी सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी, न.प.-न.पं., सर्व ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

******

No comments: