09 January, 2022

 

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी

जिल्हा, तालुका नियंत्रण कक्षासह विविध विभागात नियंत्रण कक्षाची स्थापना

                                                                   -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार जगभर अत्यंत वेगाने होत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण गत आठवड्यात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी कोरोना विषाणूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियंत्रण कक्ष, प्रत्येक तहसील कार्यालयात तालुका नियंत्रण कक्ष, तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जिल्ह्यातील संबंधित विभागामध्ये समन्वय, नागरिकांच्या कोरोनाबाबतच्या तक्रारी  व मदतीच्या अनुषंगाने कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.  

त्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागात तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करावा. या नियंत्रण कक्षात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी कार्यान्वित करुन सर्वत्र प्रसारित करावा. हे नियंत्रण कक्ष 24 तास चालू राहील याची दक्षता घ्यावी. नियंत्रण कक्षाद्वारे विभागामध्ये समन्वय व नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्यात यावे. तसेच गृह विलगीकरणातील सर्व रुग्णांची नियमितपणे चौकशी करणे व सातव्या दिवशी डिस्चार्ज करुन पोर्टलवर अपडेट करणे. तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे टेस्टींग व लसीकरण झाले असल्याची खात्री करणे. या कामासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येऊन संबंधितांवर कायद्यानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित सर्व विभाग प्रमुखाची , कर्मचारी यांची असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

*******

No comments: