24 January, 2022

 

स्थानिक तक्रार निवारण समितीच्या सदस्य पदासाठी

पात्र व इच्छूक व्यक्तींनी 28 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

 

              हिंगोली (जिमाका), दि. 24 : विशाखा जजमेंटमधील तरतूदीनुसार कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम 2013 व नियम दि. 9 डिसेंबर, 2013  रोजी प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. या अधिनियमातील कलम 6(1) नुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतूद आहे.  या अधिनियमानुसार स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याचे पूर्ण अधिकार प्रत्येक जिल्ह्याचे नियुक्त जिल्हा अधिकारी (District Officer) या नात्याने  उपजिल्हाधिकारी यांना आहेत.

या जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीची रचना - अध्यक्ष - सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव व महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते. जिल्ह्यातील गट, तालुका, तहसील,  प्रभाग, नगरपालिका या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलामधून एका सदस्याची निवड करण्यात येते. महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकीय संघटना, संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यांमधून दोन सदस्यांची निवड करण्यात येते. यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. परंतु त्यापैकी किमान एका सदस्यांची पार्श्वभूमी प्राधान्याने कायद्याची (Legal) असावी. तसेच त्यापैकी किमान एक सदस्य अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे या समितीचे पदसिध्द सदस्य सचिव असतील .

स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष  सदस्य यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक नसेल.   स्थानिक तक्रार समितीचे अध्यक्ष किंवा कोणतेही सदस्य हे या अधिनियमाच्या कलम 16 मधील तरतुदीचे उल्लंघन करीत असतील किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये त्यांच्याविरुध्द अपराधाची चौकशी प्रलंबित असेल किंवा  ते कोणत्याही शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये दोषी असल्याचे आढळून आले असतील किंवा त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही प्रलंबित असेल, किंवा अशा रितीने त्याने पदावर राहून सार्वजनिक  हितास बाधा पोहोचवून त्याच्या पदाचा दुरुपयोग केला असेल. अशा अध्यक्ष किंवा सदस्य यांना पदावरुन दूर करण्यात येईल आणि अशा रितीने रिक्त झालेले पद किंवा कोणत्याही नैमित्तिक कारणाने रिक्त झालेले पद या अधिनियमातील तरतूदीनुसार जिल्हा अधिकारी (District Officer) नव्याने नामनिर्देशन भरतील.

               ही समिती गठीत करण्यासाठी  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांच्याकडून जिल्ह्यातील पात्र व इच्छूक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यांनी स्थानिक तक्रार समितीमध्ये काम करण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र देणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाला दि.28 जानेवारी, 2022 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून नामनिर्देशनाने जिल्हा अधिकारी (District Officer) या नात्याने मा.उपजिल्हाधिकारी, हिंगोली  हे अध्यक्ष व सदस्यांची  निवड करतील.

               अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस -7, हिंगोली 431513 येथे संपर्क करावा, असे आवाहन विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: