03 July, 2023

 

एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रम राबविण्याचे आवाहन

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : एक विद्यार्थी-एक वृक्ष हा उपक्रम सन 2019 पासून दरवर्षी अकोला पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी सविस्तरपणे निर्देश दिले आहेत. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावर्षी सुध्दा हिंगोली जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी सर्व शासकीय विभाग व जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संख्येएवढे दरवर्षी वृक्ष जिल्हा प्रशासनामार्फत मोफत पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल. या उपक्रमांबाबत सर्व विभाग प्रमुखांनी खालील मार्गदर्शक सूचनांचा तंतोतंत अवलंब करावा.

            हा उपक्रम दरवर्षी 01 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये राबवायचा असल्याने प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांने एक वृक्ष लावणे आवश्यक आहे. या उपक्रमाबाबतच्या परिपत्रकाची प्रत प्रत्येक शिक्षकास देण्यात यावी व एक प्रत शाळेच्या नोटीस बोर्डावर लावावी. या उपक्रमांबाबत शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, वर्ग शिक्षकांनी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे. सर्व विद्यार्थ्यांनी वृक्ष लावले किवा कसे याबाबतची माहिती घेण्याची जबाबदारी वर्गशिक्षकांकडे असणे अनिवार्य आहे.

            विद्यार्थ्यांनी या उपक्रमात वृक्ष हे फक्त शाळेत लावण्यासाठी सक्ती करु नये. विद्यार्थ्यांस त्यांच्या सोईच्या ठिकाणी जेथे तो वृक्षाचे चांगल्या प्रकारे संगोपन करेल अशा ठिकाणी लावता येईल. विद्यार्थ्यांने लावलेल्या झाडास त्या विद्यार्थ्यांचे नाव देणे तसेच त्यांचा वाढदिवस झाडासोबत साजरा करण्याबाबत प्रेरणा द्यावी. कोणतेही झाड लावण्यासाठी शासनाच्या यंत्रणेमार्फत, प्रयोजकामार्फत किंवा स्वत: घेऊन किंवा बिजाद्वारे तयार करुन प्रत्येक विद्यार्थ्याला झाड लावण्याबाबत सूचित करावेत. विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षाबाबत दर महिन्याला त्या वृक्षाची स्थिती जाणून घ्यावी. एखादे वृक्ष काही कारणाने सुखल्यास त्या वृक्षाऐवजी दुसरे नवीन वृक्ष लावण्याबाबत त्यांचे प्रबोधन करावे. जे विद्यार्थी वृक्ष लावतील व त्या वृक्षाचे चांगल्या प्रकारे संगोपन करतील, त्या विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय वर्षात गुणपत्रकात काही गुणांचा समावेश करावा. या उपक्रमात सर्व शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष लावण्याबाबतचा अहवाल सादर करावा. या अहवालामध्ये शाळेचे नाव, विद्यार्थ्यांचे नांव, वृक्षाचे नाव याचा समावेश असावा.

            वरील सर्व सूचनांचे पालन करुन एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रम राबवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी केले आहे.

******

No comments: