03 July, 2023

 

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात साजरे करीत असताना यामध्ये केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नव उद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्‌स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु केली आहे.

            या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी खालील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

            या योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल. संबंधित लाभार्थ्यांचे आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र आवश्यक आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजक इच्छूक पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यात तीन प्रतीत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: