पीक कर्जाचे निर्धारित लक्ष साध्य करण्यासाठी
शेतकरी बांधवांनी पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण
करावेत
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : खरीप पीक कर्ज वाटपाचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन
पीक कर्ज वाटप करणे, विद्यमान पीक कर्ज वाढीसह नुतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्व बँका गावागावात शिबीरे आयोजित करुन पीक कर्ज वाटपाचे निर्धारित लक्ष साध्य
करण्यासाठी शेतकरी बंधूना घरोघरी भेटून वेळेवर पीक कर्ज नुतनीकरण करण्यासाठी
सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या
मार्गदर्शक तत्वानुसार अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परतफेड 365 दिवसांच्या आत किंवा
दरवर्षी 30 जून रोजी किंवा त्यापूर्वी केली पाहिजे. पीक कर्जाचे नुतनीकरण
केल्यानंतर शेतकरी मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाच्या रकमेत वाढीस पात्र होतात.
जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड
करतात त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत
प्रत्येकी 3 टक्के व्याज सवलत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज
मिळते. पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण केल्यामुळे शेतकरी बँकांच्या इतर सुविधांचा
सुध्दा लाभ घेऊ शकतात. कर्ज चुकते न झाल्यास पीक कर्ज खाती थकीत खाती बनतात व अशा
शेतकऱ्यांसाठी बचत खात्यातील व्यवहारावर मर्यादा येतात.
पीक कर्जाचे निर्धारित लक्ष साध्य
करण्यासाठी शेतकरी बांधवांनी पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण करावेत, असे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment