03 July, 2023

 

बदलत्या हवामानाला समजून घेऊन शेती करणे आवश्यक

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पी.पी.शेळके

 

 

हिंगोली (जिमाका), दि.03 : मान्सूनच्या पावसाची पाहिजे तशी सुरुवात या वर्षी झाली नाही, अनेक अंदाज चुकले आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा अजून झाली नाही. अशा परिस्थितीत आता काय करावे ? असे सर्वाना वाटत आहे. त्यासाठी अनेक हवामान विभागाच्या तज्ञांच्या सोबत चर्चा केली असता असे लक्षात आले आहे. आतापर्यंत आपल्या राज्यात 60 टक्के तुटीचा पास झाला आहे आणि असाच आणखी दोन आठवडे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.  भारतीय हवामान विभागाच्या एक्सटेनडेड रेंजच्या अंदाजानुसार सुद्धा मध्य भारतावर हलका ते मध्यम असाच पास दिसतो आहे. मात्र जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात पास दिसतो आहे, ही सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमेची बाब आहे.

                हे वर्ष कमी पावसाचे आहे असे समजून शेतकऱ्यांनी आपले नियोजन करणे गरजेचे आहे. वेळोवेळी पेरणी योग्य पास झाल्यावर शेतकऱ्यांना नियमित कृषी सल्ला देण्यात येईल.  त्यासाठी दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ ऑनलाइन पद्धतीने आणि दूरध्वनीवर तसेच प्रत्यक्ष सुद्धा उपलब्ध राहतील. त्यांचा सल्ला घेवून शेतकऱ्यांनी आलेल्या समस्येचे निवारण करुन घ्यावे.

                आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे ज्या ठिकाणी पास पेरणीयोग्य झालाच नाही तर काय करावे यासंबंधी विद्यापीठाने दिलेली पिके पेरावी.  जसे 1 ते 7 जुलै दरम्यान जवळ जवळ सर्वच  पिके पेरता येतील. 8 जुलै ते 15 जुलै पर्यंत पेरणी करायची वेळ आली तर सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, बाजरी, तीळ आणि सुर्यफुल हि पिके पेरता येतात.  मात्र मुग, उडीद, आणि भुई मुग  पेरु नये. ज्या ठिकाणी 16 जुलै ते 31 जुलै दरम्यान पेरणी करण्याची वेळ आली तर सोयाबीन + तूर ( 4 : 2), सुर्यफुल, बाजरी + तूर ( 3 : 3), एरंडी +धने, एरंडी+तूर या प्रकारची योजना करुन पिके घ्यावी. कापूस, ज्वारी आणि भुईमूग मात्र पेरु नये.

                हळद पिकाची लागवड तशी 15 जून पर्यंतच करायची असते.  मात्र उशीरा लागवड केल्यास उत्पादनात घट येते हे गृहीत धरुन लागवड केली असल्यास हरकत नाही. लागवड करताना योग्य ती बीज प्रक्रिया करावी आणि अशा लागवड केलेल्या हळद पिकास पाण्याचा ताण पडू देवू नये. खताचा बेसल डोस द्यावा, तसेच लागवडीच्या 1-2 दिवसात जमीन ओली असेल तेव्हा उगवण पूर्व तणनाशक अट्राझीन 5 ग्राम प्रती लिटर पाण्यात फवारुन द्यावे. हळदीसाठी कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध बायोमिक्स, ट्रायकोडरमा, हळद स्पेशल आणि जीवामृत या निविष्ठांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ.पी.पी.शेळके यांनी केले आहे. 

*****

No comments: