05 February, 2025
सावा येथे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 05 : येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने सावा येथे संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न होत आहे. यामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 ची जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाहाचे संपूर्ण उच्चाटन होण्यासाठी जिल्हास्तरावरील यंत्रणेबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच पंचायत, आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभागाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त सहभागातून बाल विवाहाबाबत जनजागृती केली. महिला सबलीकरण व बाल विवाह एक समस्या या विषयावर सविस्तर माहिती दिली. यामध्ये बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीच्या वयाची 18 वर्षे व मुलाच्या वयाची 21 वर्षे पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करीता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले.
चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालकाकरिता तात्काळ मदत करणारी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 व पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 ची माहिती दिली. तसेच बालकांसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय यंत्रणेबाबत व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींना बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेची शपथ दिली. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बालक म्हणजे काय, दत्तक विधान व अनाथ प्रमाणपत्राबाबत माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमासाठी चाईल्ड हेल्पलाईन समुपदेशक अंकुर पाटोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कऱ्हाळे व इतर प्राध्यापक वृंद, सर्व स्वयंसेवक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment